हिंगोली : भारतात दुसऱ्या क्रमांकाचा दसरा महोत्सव असलेल्या हिंगोलीच्या महोत्सवात आज (दि.२४) रात्री ११:४१ वाजता ५१ फुट उंचीच्या रावणाच्या पुतळ्याचे दहन होणार आहे. यानिमित्त रामलीला मैदान गर्दीने फुलले असून, शहरांसह ग्रामीण भागातून नागरीक मैदानावर दाखल होत आहेत.
१५ ऑक्टोबरपासून रामलीला मैदानावर दसरा महोत्सव सुरू आहे. या महोत्सवात धार्मिक, सांस्कृतीक कार्यक्रमांसह विविध स्पर्धाही घेण्यात येत आहेत. दसऱ्याचे मुख्य आकर्षण असलेल्या रावण दहन कार्यक्रमास जिल्हाभरातून हजारोंच्या संख्येने नागरीक उपस्थित राहणार आहेत. रात्री ११:४१ वाजता ५१ फुट उंच रावणाच्या पुतळ्याचे दहन करण्यात येणार आहे.
फटाक्यांच्या आतषबाजीने उजळणार रामलीला मैदान...रावणाचा पुतळा दहनप्रसंगी रामलीला मैदानावर नेत्रदीपक आतषबाजी करण्यात येणार आहे. विशेष म्हणून यासाठी वाॅटरप्रूफ फटाक्यांचा वापर करण्यात आल्याची माहिती महोत्सव समितीने दिली. यात कलर तोफ, आवाजाचे फटाके आदींचा समावेश असणार आहे. या आतषबाजीने रामलीला मैदान उजळून निघणार आहे.
रामलीलेत प्रभू श्रीराम-रावणाचे युद्ध...घटस्थापनेपासून येथील रामलीला मंचवर रामलीलेचे आयोजन करण्यात आले असून, कलावंतांच्यावतीने रामायणातील विविध प्रसंग सादर करण्यात येत आहेत. दसऱ्याच्या दिवशी प्रभू श्रीराम-रावणातील युद्ध व रावण वधाचा प्रसंग सादर करण्यात येणार आहे.