- रमेश कदम आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : बाळापुरवरून जंगी पाहुणचाराचे सामान घेऊन दुचाकीने गावाकडे निघालेल्या व्याह्यांच्या दुचाकीला कॅनॉलच्या पुलावर अपघात झाला. गाडीवरचे नियंत्रण सुटल्याने कॅनलच्या कठड्यावर गाडी जोरात आदळली. त्यानंतर दोघेही कठड्यावरून कॅनॉलमध्ये पडले. यावेळी कॅनॉलमधील दगडावर पडल्याने डोक्याला जोरदार मार लागून गंभीर जखमी झालेल्या दोघांचाही या अपघातात मृत्यू झाला. गणेश मारुती डोके आणि भाऊराव श्रीराम हेगडे अशी मृतांची नाव आहेत.
आखाडा बाळापूर ते शेवाळा या रोडवर दिनांक 2 ऑगस्ट रोजी सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास ही भीषण घटना घडली. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचाडा येथील रहिवासी असलेले गणेश मारुती डोके (अंदाजे वय 55 ते 60 ) हे व त्यांचे व्याही भाऊराव श्रीराम हेगडे ( राहणार साखरा ,तालुका उमरखेड ,जिल्हा यवतमाळ ) हे दोघेजण बाळापुर येथे आले होते. सामान खरेदी करून दुचाकीने उंचाडा गावाकडे निघाले. सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास गावाकडे जात असताना दुचाकी बाळापूर ते शेवाळा रोडवरील कॅनलच्या पुलावर गेले असता वळण रस्त्यावर त्यांची गाडी नियंत्रणा बाहेर गेली. भरधाव वेगात गाडी कठड्यावर आदळली . गाडीवरील दोघेही जण कठड्यावरून उडून कॅनालमध्ये पडले.
कॅनालमध्ये असलेल्या दगडांवर आपटल्याने त्यांच्या डोक्याला जबर मार लागला. यात एकजण जागीच ठार झाला. तर एक जण गंभीर जखमी झाला. त्याला ॲम्बुलन्सने नांदेडला घेऊन जात असताना वारंग्यापर्यंत जाताच त्याचाही मृत्यू झाला. दोघांचाही मृत्यू झाल्याने परिसरात खळबळ माजली. दोघांचाही मृतदेह बाळापूरच्या ग्रामीण रुग्णालयात ठेवण्यात आला असल्याचे पोलिस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे यांनी सांगितले . घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक विष्णुकांत गुट्टे, जमादार राजीव जाधव , शिवाजी पवार घटनास्थळी पोहोचले. जखमींना ग्रामीण रुग्णालयात हलविले. त्यांच्या नातेवाईकांना खबर दिली. या प्रकरणाची नोंद घेण्यात आली असली तरी याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
जंगी पाहुणचाराची तयारी जीवावर बेतली....व्याही घरी आल्यामुळे पाहुणचार करण्यासाठी ते बाळापूरला आले. जंगी पाहुणचार करण्यासाठी बाळापुरातून सामान घेऊन गावाकडे जाताना ही दुर्दैवी घटना घडली .पाहूणचाराची जय्यत तयारी करत असताना हा अपघात घडून व्याह्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.