हिंगोली : स्कार्पिओ जीपमधून धावत्या ट्रकमध्ये चढून दीड लाखांची सुपारी लंपास करणाऱ्या टोळीच्या स्थानिक गुन्हे शाखेने मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरीसाठी वापरलेली दुचाकी, मोबाईल व एक लाख ४० हजारांची सुपारी असा मुद्देमाल जप्त केला.
मध्यप्रदेशातील सागर येथील रंजीत चंद्रशेखर तिवारी यांनी हैदराबाद येथून ट्रकमध्ये सुपारीचा माल भरला होता. हा माल दिल्ली येथे पोहचती करावयाचा होता.२० ऑगस्ट रोजी सकाळी ७:३० वाजता ते लोहा येथून वारंगा फाटाकडे ट्रक घेऊन निघाले. पुढे वारंगा फाटा परिसरात एका ढाब्याजवळ त्यांनी ट्रक थांबवून पाहणी केली असता सुपारीचे ४ पोते कमी आढळले. या प्रकरणी त्यांनी २२ ऑगस्ट रोजी आखाडा बाळापूर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदविली होती.धावत्या ट्रकमधून माल लंपास करण्याची घटना घडल्याने माल वाहतूक चालकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी या गुन्ह्याचा छडा लावण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेला दिल्या होत्या. त्यावरून पथकाने तपास सुरू केला होता.
यावेळी यातील चोरटे हे नांदेड येथील असून त्यांची नावे शेख मोईन शेख महमूद (रा.नांदेड), शेख शाहरुख शेख अजगर (रा. देगलूर नाका नांदेड), सोहेल खान (रा. इतवारा नांदेड), इलियास खान उर्फ इल्लू (रा.चौरस्ता नांदेड) असे असल्याचे निष्पन्न झाले. यातील शेख मोईन यास शिवशक्ती नगर परिसर नांदेड येथून ताब्यात घेतले. तर चोरीची सुपारी घेणारा शेख अल्ताफ शेख युनूस (रा. वसमत) यास वसमत येथून ताब्यात घेतले. त्यांना विचारपूस केली असता त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली. त्याचेकडून ६५ किलो सुपारी, दुचाकी व मोबाईल असा एक लाख ४० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. ही कार्यवाही पोलिस अधीक्षक जी. श्रीधर , अपर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील , पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक शिवसांब घेवारे , अंमलदार शेख बाबर, विठ्ठल कोळेकर ,गणेश लेकुळे ,आकाश टापरे ,नरेंद्र साळवे, प्रशांत वाघमारे यांच्या पथकाने केली.
अशी करायचे चोरी -धावत्या ट्रकच्या पाठिमागे स्कार्पिओ जीप लावून काही चोरटे ट्रकवर चढले. त्यानंतर ट्रकमधील मालाचे पोते खाली फेकले. खाली फेकलेली पोते पाठिमागे असलेल्या स्कार्पिओमध्ये भरून घेतले. यात आणखी चोरट्यांचा समावेश असण्याची शक्यता असून स्कार्पिओ जीपही जप्त करावयाची आहे. त्या दिशेने पोलिस तपास करीत आहेत.