हिंगोली : शिधापत्रिकेवर कमी किमतीत दिला जाणारा ३०० क्विंटल तांदूळ व ३० क्विंटल गहू काळ्या बाजारात विक्रीसाठी नेला जात असताना पोलिसांनी पकडला. ही कारवाई तालुक्यातील लिंबाळा मक्ता येथील एमआयडीसी भागात १२ ऑक्टोबर रोजी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात चालकांविरूद्ध रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला.
रेशन दुकानावर गरजूंना स्वस्त दरात दिले जाणारे धान्य काळ्या बाजारात विक्रीसाठी नेले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर, अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत काळे, सहाय्यक पोली अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे, पोलीस निरीक्षक आर. एन. मळघने यांच्या पथकाने बुधवारी पहाटेच्या सुमारास लिंबाळा मक्ता भागातील एमआयडीसी येथील एका वजन काट्याजवळ दोन वाहनांची तपासणी केली. यात ट्रक क्रमांक एमएच २६बीई २८९२ मध्ये व मालवाहु जीप क्रमांक एमएच ३८ एक्स २८२३ यात रेशनचे धान्य आढळले.
तसेच ट्रकमध्ये ३०० क्विंटल तांदूळ व मालवाहू जीपमध्ये ३० क्विंटल गहू असल्याचे तपासात स्पष्ट झाले. पोलिसांनी ६ लाखांचा ट्रक, ३ लाखाची मालवाहू जीप, ६७ हजार ५०० रूपये किमतीचा गहू व ५ लाख ७० हजार रूपये किमतीचा तांदूळ असा एकूण १५ लाख ३७ हजार ५०० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी पोलीस निरक्षक आर. एन. मळघने यांच्या फिर्यादीवरून ट्रक चालक अमरजितसिंग नजरसिंग गवराय (रा. नांदेड), जीप चालक प्रकाश विलास श्रीरामे (रा. आठवडी बाजार, हिंगोली) यांचे विरुध्द हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
रेशन धान्याचा काळाबाजार वाढलादोन दिवसांपूर्वीच वसमत तालुक्यात काळ्या बाजारात जाणारे रेशनचे धान्य पोलिसांनी पकडले होते. त्यानंतर पुन्हा दोन दिवसांतच दुसरी कारवाई करण्यात आली. ऐन सणाच्या काळात गरीबांना मिळणारे धान्य काळ्या बाजारात जात आहे. आता हे धान्य कोणत्या रेशन दुकानातील आहे? याचा पोलीस तपास घेत आहेत.