हिंगोली : येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्यास मारहाण केल्याप्रकरणी आमदार संतोष बांगर यांच्यासह ३० ते ४० जणांविरुद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात २८ जानेवारीला पहाटे तीनच्या सुमारास गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्राचार्य अशोक उपाध्याय यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले की, १८ जानेवारीला आमदार संतोष बांगर हे साडेअकरा ते बाराच्या सुमारास लिंबाळा मक्ता येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्य कक्षात शंकर बांगर व इतर ३० ते ४० जणांसोबत आले होते. या महाविद्यालयातील अधिव्याख्याता महिला व पुरुष यांनी प्राचार्य आम्हाला विनाकारण त्रास देतात, संध्याकाळी सात वाजेपर्यंत मीटिंग घेतात, त्यामुळे आम्हाला येणे जाणे करण्यासाठी त्रास होत आहे, असे आमदार बांगर यांना सांगितल्याने ते महाविद्यालयात आले होते. आमदार बांगर, शंकर बांगर व महाविद्यालयातील प्राध्यापक, प्राध्यापिकांनी गोंधळ घातला. तसेच प्राचार्य उपाध्याय व साक्षीदारांना गालात थापड मारून शासकीय कामात अडथळा निर्माण केला. प्राचार्य कक्षात लावलेल्या सीसीटीव्ही यंत्रणेचा डीव्हीआर तोडून पाच हजार रुपयांचे नुकसान केले, असेही तक्रारीत म्हटले. हे प्रकरण काही दिवसांपासून चर्चेत आल्याने प्राचार्यांनी वरिष्ठांशी चर्चा करून तक्रार दिल्याचे म्हटले आहे. तब्बल दहा दिवसांनंतर या प्रकरणात गुन्हा दाखल झाला आहे.
प्राचार्यानेही केला अधिव्याख्याता महिलेचा विनयभंगदरम्यान, २८ रोजी दुपारी प्राचार्य अशोककुमार उपाध्याय यांच्याविरोधात एका अधिव्याख्याता महिलेच्या तक्रारीवरून हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपाध्याय हे १४ सप्टेंबर २०२१ ते ६ डिसेंबर २०२२ या काळात शासकीय तंत्रनिकेतन व निवासस्थान येथे पदाचा वापर करून बोलावत होते, तर कार्यालयीन वेळेनंतरही बोलावून विकृत भाष्य करून हिणवून अर्वाच्च भाषेत बोलायचे. तसेच अंघोळ करताना तिला पाहून सतत बाथरूमलगत चकरा मारून विनयभंग केला. फिर्यादी महिलेसह इतर महिलांनाही पदाचा गैरवापर करून धमकावत असल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.