- इस्माईल जहागिरदारवसमत/ हट्टा (जि. हिंगोली) : तालुक्यातील थुना नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात एक गुराखी वाहून गेला. घटनेची माहिती कळताच हट्टा पोलिस व जीवरक्षकांच्या मदतीने गुराख्याचे शोधकार्य सुरू करण्यात आले. सोमवारी दुपारी गुराख्याचा मृतदेह आढळून आला. ही घटना २८ जुलै रोजी सायंकाळी घडली.
२९ जुलै रोजी पावसाने उघाड दिली असली तरी मागच्या आठ दिवसांपासून वसमत तालुक्यातील सर्वच भागात संततधार पाऊस सुरूच आहे. रात्रीच्या वेळी अनेक ठिकाणी पाऊस जोरदार हजेरी लावत आहे. दरम्यान, आरळजवळील थुना नदीला पूर आला. यावेळी गुराखी बाबूराव पूरभाजी वाघ (वय ५५, रा. आरळ) हा आपली जनावरे घेऊन नदीतून जात होता. पाण्याचा प्रवाहाचा अंदाज न आल्याने गुराखी वाहून गेला. पुराच्या पाण्यातून जनावरांनी नदीचा काठ गाठला. परंतु, पाण्याचा प्रवाह अधिक असल्यामुळे गुराखी पाण्यात वाहून गेला.
घटनेची माहिती कळताच हट्टा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संग्राम जाधव, फौजदार गोविंद जाधव, सूर्यवंशी, इक्बाल शेख, महेश अवचार, कासले आदी पोलिस कर्मचाऱ्यांसह तलाठी ए. बी. आहेर व जीवरक्षकांनी नदीच्या ठिकाणी जाऊन पाहणी केली. गुराखी शोधण्याचे काम हाती घेतले. तब्बल वीस तासांनंतर २९ जुलै रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास आरळ शिवारात गुराख्याचा मृतदेह आढळून आला.