हिंगोली: तालुक्यातील नर्सी (नामदेव) येथील श्री संत नामदेव महाराज मंदिरातील दानपेटी २१ ऑगस्ट रोजी उघडण्यात आली. त्यावेळी दानपेटीत ४ लाख १९ हजार ५१० रुपये दान निघाल्याची माहिती मंदिर संस्थानच्या वतीने देण्यात आली.
यापूर्वी मंदिर जिर्णोद्वार समितीची दानपेटी उघडण्यात आली होती. त्यानंतर आता मंदिर संस्थानची दानपेटी उघडण्यात आली आहे. नर्सी (नामदेव) येथे श्री संत नामदेवांचे मोठे मंदिर असून महाराष्ट्रासह परराज्यांतील भाविक येथे दर्शनासाठी येतात. गत जून, जुलै या दोन महिन्यांमध्ये संकष्ट चतुर्थी, योगिनी एकादशी, आषाढ प्रारंभ, देवशयनी एकादशी, गुरुपौर्णिमा, कामिका एकादशी, आषाढ आमावस्या, अधिक श्रावण आमावस्या आदी सण, उत्सव पार पडले. या दरम्यान, भाविकांनी श्री संत नामदेवांच्या चरणी मोठ्या प्रमाणात दान केले.
श्री संत नामदेव मंदिरातील सभामंडपात चारही बाजुंनी सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. २१ ऑगस्ट रोजी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात एका मंदिरातील हॉलमध्ये दानपेटीतून रक्कम काढून त्याची मोजदाद करण्यात आली. यावेळी हिंगोली धर्मादाय निरीक्षक खोडके, महसूलचे तलाठी नवनाथ वानोळे, संस्थानचे सचिव व्दारकादास सारडा, विश्वस्त भिकुलाल बाहेती, भागवत सोळंके, अंबादास गाडे, संजय देशमुख, मनोज आखरे, ग्रामपंचायत सदस्य राहुल मोरे, सुरज चाकोतकर, हरी मोरे, गोलू नितनवरे आदींची उपस्थिती होती.