हिंगोली : ऑटोरिक्षातून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या खिशातून ५० हजार रूपये जबरदस्तीने काढून घेणाऱ्या टोळीला पकडले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. त्यांच्याकडून रोख रक्कम व ऑटोरिक्षा जप्त केला.
पांगरी (ता. जिंतूर) येथील हरिभाऊ तुकाराम बुधवंत हे १ एप्रिल रोजी हिंगोली शहरात आले होते. त्यांना नाईकनगर येथे जायचे असल्याने त्यांनी ऑटो थांबविला. त्यानंतर ते नाईकनगरकडे निघाले. मात्र ऑटोरिक्षा चालकाने ऑटो नाईकनगरकडे नेण्याऐवजी इंदिरा गांधी पुतळ्याच्या बाजूला नेला. यावेळी ऑटोतील अन्य दोघांनी बुधवंत यांच्या सोबत झटापट करून त्यांच्या पँटच्या खिशातील ५० हजार रूपये बळजबरीने काढून घेतले. त्यानंतर तिघेही निघून गेले. याप्रकरणी हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली.
यावेळी यातील तिघेजण इंदिरा गांधी चौक भागात एका ऑटोमध्ये बसल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यावरून पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेत विचारपूस केली असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच त्यांनी त्यांची नावे गजानन ज्ञानबा हांडे (ऑटोचालक रा. हमालवाडी, हिंगोली), वैजनाथ उर्फ वैजू बबन चव्हाण (रा. पारधीवाडा हिंगोली), भिकाजी उर्फ भैरा जगन काळे (रा. पारधीवाडा, हिंगोली) अशी सांगितली. पोलिसांनी त्यांच्याकडून रोख ५० हजार व २ लाखांचा ऑटोरिक्षा जप्त केला. ही कारवाई पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक पंडित कच्छवे, पोलिस उपनिरीक्षक विक्रम विठुबोने, पोलिस अंमलदार नितीन गोरे, शंकर ठोंबरे, किशोर सावंत, विशाल खंडागळे, आजम प्यारेवाले, प्रमोद थोरात, नरेंद्र सावळे यांच्या पथकाने केली.