- इस्माईल जहागिरदारवसमत: शहरातील गुरुद्वारा परिसरातील प्राचीन गाव तलाव गुरुवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे फुटला. यावेळी शहरातील अनेक घरे पाण्याखाली गेली होती. यामुळे नागरिक आणि प्रशासनाने रात्र जागून काढली. प्रशासनाने पाण्यात अडकलेल्या अनेक कुटुंबांना सुरक्षितस्थळी पोहोचविले. आज सकाळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शहरातील नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून तातडीने पंचनामे करत शासनाची मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.
वसमत शहरात २७ जुलै रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८ वाजेदरम्यान २२५ मिमि पाऊस झाला. ढगफुटी झाल्याने शहरातील अख्खे रस्ते हे नदीपात्रासारखे वाहत होते. दरम्यान, पावसाचे उग्ररुप पाहून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. शहरातील विविध भागांतील घरात पावसाचे पाणी शिरुन मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रात्री ९:३० वाजेदरम्यान शहरातील गुरुद्वारा परिसरात असलेला प्राचीन गाव तलाव तुडूंब भरल्याने फुटला. तलाव फुटल्याने गडी मोहल्ला, शुक्रवार पेठ यासह इतर भागांतील अनेक घरात पाणी शिरले. त्यामुळे अन्नधान्य, जीवनावश्यक वस्तूंचेमोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शाळा, महाविद्यालयात केली व्यवस्था
अंधार असल्याने पाणी कोठून येत आहे हे कळत नव्हते. त्यामुळे नागरिकांना अनंत अडचणीचा सामना करावा लागला. आरडाओरडा करत एकमेकांना नागरिकांना मदत केली. प्राचीन गाव तलावाची १९७२ मध्ये दुरुस्ती करण्यात आली होती. तेंव्हापासून तलावाची दुरुस्ती करण्यात आली नाही. उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खलाळ, तहसीलदार शारदा दळवी, नपचे मुख्याधिकारी अशुतोष चिंचाळकर, वैद्यकीय अधीक्षक गंगाधर काळे यांच्यासह प्रशासनातील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बचावकार्य राबत अख्खी रात्र जागून काढली. नुकसानग्रस्त नागरीकांच्या राहण्याची व्यवस्था शहरातील शाळा, वाचनालय, आरोग्य केंद्रात करण्यात आली होती. गुरुवारची रात्र वसमतकरांच्या अंगावर काटा आणणारी होती. महात्मा फुले नगर, पाटील नगर, समीर नगर, विष्णूनगर, होमगार्ड कॉलनी, अभिनव राम मंदिर या परिसरातही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी केली पाहणी आज सकाळी ७ वाजेदरम्यान जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी शहरातील नुकसान ग्रस्त भागाची पाहणी केली. नुकसानग्रस्त भागातील नागरिकांशी त्यांनी संवाद साधला. तसेच नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेशही दिले. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, तहसीलदार शारदा दळवी, गटविकास अधिकारी उमाकांत तोटावाड, कृषी अधिकारी सुनील भिसे, सुनील अंभोरे, डॉ सन्नाउल्ला खान,तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदिप काळे आदी उपस्थित होते. शिवसेना तालुकाप्रमुख राजू चापके, प्रभाकर क्षीरसागर यांनी नुकसानग्रस्त कुटुंबांना त्वरित मदत मिळावी, मदतकार्य त्यांच्यापर्यंत पोहोचावे, अशी मागणी केली.
पंचनामे करण्यास प्रारंभ...ढगफुटी व गावतलाव फुटून नुकसान झालेल्या भागांची पाहणी करुन प्रशासनाच्या वतीने नियुक्त केलेल्या पथकांनी पंचनामे करण्यास सुरुवात केली. पंचनामे करताना नुकसानग्रस्त कुटुंब सुटणार नाहीत याची काळजी घेतल्या जात आहे.
नुकसानीची नगरपालिकेत माहिती द्यावी....ज्या नागरिकांचे पाण्यामुळे नुकसान झाले. त्यांच्यापर्यंत प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी पोहोचले नाही अशांनी नगरपालिकेत नाव नोंदणी करुन माहिती द्यावी. तसेच नगरपालिका प्रशासनाने नुकसानग्रस्त कुटुंबांना राहण्याची जागा उर्दु शाळा, दवाखाना,वाचनालयात केली असल्याची माहिती मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांनी सांगितले.
नुकसानग्रस्त भागांचे पंचनामे सुरु...गुरुवारी सायंकाळी झालेल्या पावसाने नुकसान मोठ्या प्रमाणात झाले. शहरातील नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करण्यास शुक्रवारी ११ वाजेपासून सुरुवात करण्यात आली आहे. तसेच ग्रामीण भागातील पंचनामे कृषी सहायक, तलाठी हे करत आहेत.-डॉ. सचिन खल्लाळ,उपविभागीय अधिकारी वसमत.
वसमत शहरात २२५ मिमि पावसाची नोंद....वसमत मंडळातील शहरात गुरुवारी सायंकाळी २२५ मिमि पाऊस झाला. या पावसामुळे शहरातील अनेक भागातील घरात पाणी शिरले. त्यामुळे नागरीकांचे नुकसान झाले आहे. नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करण्यात येत आहे.नुकसान ग्रस्त कुटुंबांना त्वरित मदत मिळावी यासाठी प्रशासन कार्य करत आहे.-शारदा दळवी, तहसीलदार वसमत.