आखाडा बाळापूर ( हिंगोली) : गावातीलच एकाने १५ वर्षीय मुलीला रात्री सात वाजता घरी बोलावून विनयभंग करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना मंगळवारी रात्री दिग्रस वंजारी येथे घडली. याप्रकरणी पिडीतेच्या तक्रारीवरून आखाडा बाळापूर पोलीस ठाण्यात शिवाजी पुरभाजी खांडरे ( ४२) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कळमनुरी तालुक्यातील दिग्रस वंजारी येथील शिवाजी पुरभाजी खांडरे याने मंगळवारी ( दि. १७ ) रात्री सात वाजेच्या सुमारास गावातील एका अल्पवयीन मुलीस बिल काढण्याचे कारण सांगून घरात बोलविले. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत खांडरेने आधी तिचा हात दाबला. मग तिला मिठी मारली. अचानक झालेल्या या प्रकाराने घाबरलेल्या मुलीने आरडाओरडा केला. त्यामुळे खांडरेने तिला सोडले. त्यानंतर मुलगी तिथून निघून गेली.
दरम्यान, दुसऱ्या दिवशी खांडरे मुलीच्या घरी गेला. मुलगी एकटी असताना काल तू का ओरडलीस ? आता तुझ्या घरात कोणी नाही, आता तुला जीवे मारतो अशी धमकी दिली. या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून आरोपी शिवाजी पुरभाजी खांडरे (राहणार दिग्रस बुद्रुक ) याच्या विरुद्ध भारतीय दंड विधानाच्या कलम 354 , 354 ( अ ), 452 ,506 व बाललैंगिक अत्याचार प्रतिबंधक अधिनियमाच्या कलम 8 , 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास ठाणेदार पंढरीनाथ बोधणापोड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक श्रीधर वाघमारे करीत आहेत.