हिंगोली : दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना पोलिसांनी पकडले असून तिघे पळून गेले. त्यांचेकडून दरोडा टाकण्यासाठी लागणारे साहित्य व कार जप्त करण्यात आली. ही कारवाई तालुक्यातील इडोळी टी पॉईंटवर १२ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजेच्या सुमारास करण्यात आली.
तालुक्यातील इडोळी पाटी येथे दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेले काहीजण असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्यावरून सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू यांच्या पथकाने इडोळी टी पॉईंट गाठले. यावेळी एका कारमध्ये पाच जण असल्याचे आढळून आले. त्याच्यातील दोघांना पोलिसांनी पकडले तर तिघेजण पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी तपासणी केली असता त्यांचेजवळ लोखंडी पकड, लोखंडी खंजर, तलवार, सुती दोरी, मिरची पावडर आढळून आले. या साहित्यासह पाच मोबाईल व कार असा एकूण ४ लाख ५८ हजार ७५० रूपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.
या प्रकरणी सहायक पोलिस निरीक्षक राजेश मलपिलू यांच्या फिर्यादीवरून सय्यद जुनेद सय्यद कदीर (रा. ससेवाडी हिंगोली), वाजिद खा दौलत खा पठाण (रा. समतानगर सेनगाव), इस्तेखार जुल्फेखार पठाण (रा. बावनखोली हिंगोली), शेख मोसिन शेख यूसूफ (रा. तलाबकट्टा हिंगोली), शेख अरबाज शेख अयुब (रा. गोरेगाव) याचेविरूद्ध हिंगोली ग्रामीण पोलिस ठाण्यात मंगळवारी रात्री उशिरा गुन्हा नोंद झाला. दरम्यान, यातील सय्यद जुनेद सय्यद कदीर व वाजिद खा दौलत खा पठाण हे दोघे पोलिसांच्या ताब्यात आहेत. तिघांचा पोलिस शोध घेत आहेत. पोलिस उपनिरीक्षक मुपडे तपास करीत आहेत.
एकावर पाच गुन्हे दाखलपोलिसांनी पकडलेल्या सयद जुनेद सयद कदीर याचेवर हिंगोली व परभणी जिल्ह्यात यापूवी जबरी चोरी, चोरी असे गंभीर स्वरूपाचे पाच गुन्हे दाखल आहेत.