हिंगोली: मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या प्रमुख मागणीसाठी समाजबांधवांनी ऐन दिवाळीतच साखळीउपोषणादरम्यान औंढा तालुक्यातील शिरडशहापूर येेथे रविवारी अर्धनग्न आंदोलन केले. या दरम्यान, ‘एक मराठा लाख मराठा’ अशी घोषणा देण्यात येत होती.जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण दिले जात नाही. तोपर्यंत साखळी उपोषण सुरुच राहणार आहे. मनोज जरांगे पाटील ज्या प्रमाणे आदेश देतील त्या सूचनानुसार पुढील आंदोलन केले जाईल, असा इशाराही समाजबांधवांनी दिला आहे.
गत १७ दिवसांपासून शिरडशहापूर येथील बसथांबाजवळ हे साखळी उपोषण सुरु आहे. वसुबारस पासून दिवाळी सणाला प्रारंभ झाला असला तरी लक्ष्मीपूजन व इतर दिवाळीतील दिवस साखळी उपोषणादरम्यान साजरे केले जातील, असेही मराठा समाजबांधवांनी सांगितले. मराठा समाजाच्या मुला-मुलींना नोकऱ्या मिळत नाहीत, शैक्षणिक शुल्क भरणे अवघड होऊन बसले आहे, शासनाच्या कोणत्याही योजनांचा लाभ मिळत नाही. त्यामुळे मराठा समाज मागे राहिला आहे. समाजाला आरक्षण मिळेपर्यंत हे साखळी उपोषण सुरुच राहणार, असा निर्धारही यावेळी करण्यात आला. सरकारला जागे करण्यासाठी १३ नोव्हेंबर रोजी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले. यावेळी ‘एक मराठा लाख मराठा’ या घोषणेसह इतरही घोषणा देण्यात येत होत्या. गत १७ दिवसांपासून शिरडशहापूर, उमरा, हिरडगाव, शेंदूरसना, शिरला, वाघी, शिंगी, मार्डी आदी परिसरातील मराठा समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.