वसमत (हिंगोली ) : शहरातील बस स्थानकासमोर एका ६५ वर्षीय व्यक्तीचा धारदार शस्त्राने खून करण्यात आल्याची घटना आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास उघडकीस आली आहे. अंबाजी गायकवाड असे मृताचे नाव आहे.
याबाबत प्राथमिक माहिती अशी की, आज सकाळी साडेनऊच्या वाजेच्या सुमारास बसस्थानक समोरील एका हॉटेलसमोर अंबाजी गायकवाड यांना तिघांनी रॉडने मारहाण करत खंजर पोटात भोसकला. रक्तबंबाळ अवस्थेत कोसळलेल्या अंबाजी यांचा जागीच मृत्यू झाला. यावेळी घटनास्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली होती. काहींनी वसमत शहर पोलीस ठाण्यात माहिती दिली. पोलिसांनी तातडीने बसस्थानक गाठले परंतु आरोपी तोपर्यंत घटनास्थळावरून फरार झाले होते.
घटनास्थळी धारदार शस्त्र आढळून आले. पोलिसांनी मृतदेह रुग्णालयाकडे रवाना केला. पोलिसांनी शस्त्र जप्त केले असून पुढील तपास सुरु आहे. दरम्यान, अंबाजी गायकवाड हे वसमत तालुक्यातील गणेशपुर येथील रहिवासी होते. मात्र, सध्या ते औरंगाबाद येथे वास्तव्यास होते अशी माहिती आहे. या प्रकरणी कसून तपास सुरु असून आरोपीला तत्काळ अटक केली जाईल अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनी दिली.