हिंगोली : येथील पंचायत समितीतील मग्रारोहयो कक्षात कार्यरत कंत्राटी पालक तांत्रिक अधिकारी जे.एम. पठाण यास दहा हजारांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ३० ऑगस्ट रोजी सायंकाळी सहाच्या सुमारास रंगेहाथ पकडले.
कनेरगाव येथील लाभार्थ्यांचा सिंचन विहिरींचा कुशलचा निधी मागील अनेक दिवसांपासून मिळाला नाही. यासाठी त्यांनी पालक तांत्रिक अधिकारी जे.एम. पठाण यांना अनेकदा विनवणी केली. मात्र तो मिळाला नाही. शेवटी त्यांनी प्रतिलाभार्थी पाच हजार रुपयाप्रमाणे लाचेची मागणी केली. यात दोन लाभार्थ्यांची दहा हजार रुपये लाच स्वीकारताना पठाण यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने पंचायत समितीत रंगेहाथ पकडले. पठाण हे हिंगोलीत आजम कॉलनीत वास्तव्याला आहेत. ते यापूर्वी जि.प.च्या बांधकाम विभागात कार्यरत होते. सेवानिवृत्तीनंतर कंत्राटी तत्त्वावर ते मग्रारोहयो कक्षात रुजू झाले होते.
ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अनिल कटके, पोनि प्रफुल अंकुशकर, विनायक जाधव, कर्मचारी विजय शुक्ला, पोह ज्ञानेश्वर पंचलिंगे, तान्हाजी मुंढे, भगवान मंडलिक,अकबर शेख, गजानन पवार, गोविंद शिंदे, राजाराम फुपाटे, शिवाजी वाघ, राजेंद्र वरणे आदींनी केली.