मुंबई/हिंगोली - आम्ही बंडखोर, गद्दार नाही, कुणी शिवसेनेचा बंडखोर, गद्दार म्हणून हिणवत असेल तर ऐकून घेणार नाही. त्यांचे कानशील लाल करू, असा इशारा कळमनुरीचे शिवसेनेचे आमदार संतोष बांगर यांनी दिला होता. दरम्यान, संतोष बांगर यांच्या या आव्हानानंतर आता शिवसेना समर्थकांकडून त्यांना चांगलंच ट्रोल केलं जात आहे. तुम्हाला लाखवेळा गद्दार म्हणणार, हिंमत असेल तर संतोष बांगर यांनी माझ्या कानाखाली मारून दाखवावीच, असं आव्हान शिवसेनेच्या सोशल मीडिया समन्वयक अयोध्या पौळ यांनी आमदार बांगर यांना दिले होते. त्यानंतर, आता आणखी दोन शिवसेना समर्थकांनी फोन करुन बांगर यांची फिरकी घेतल्याचं दिसून आलं आहे. सध्या हे कॉल रेकॉर्डींग व्हायरल झालं आहे.
धाराशिववरुन भाऊसाहेब मुंढे बोलतो, असे म्हणत एका शिवसेना कार्यकर्त्याने संतोष बांगर यांना फोन केला. गद्दार म्हणणाऱ्यांच्या कानाखाली आवाज काढा हे तुमचं विधान ऐकून फोन केल्याचे सांगितले. तसेच, तुम्ही स्वत: कानाखाली आवाज काढायला पाहिजे, गोरगरीब लोकांच्या मुलांना चेतावणी देऊन कशाला सांगतात, असा सवाल मुंढे यांनी केला. त्यावेळी, संतोष बांगर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीला मतदान करणारेच गद्दार आहेत, असे म्हटले. तसेच, फोन ठेवा म्हणत फोन कट केला. भाऊ बेरड नावाच्या कळमनुरी मतदारसंघातील मतदारानेही बांगर यांना फोन केला होता. मी नगरला नोकरीसाठी असतो, तुमचं अभिनंदन करायचं होतं. जाता-जाता नगरमार्गे आलात तर सत्कार करायचा होता, असे बेरड यांनी म्हटले. त्यानंतर, तुम्हाला 50 कोटी मिळालेत, मला गरज आहे मला 50 लाख रुपये द्या, मी सहा महिन्यात परत करतो, अशी मागणीही बेरड यांनी फोनद्वारे केली. त्यावर, या ना देतो... उद्याच या... असे म्हणत बांगर यांनी फोनवरील व्यक्तीला प्रतिसाद दिला. सध्या हे कॉल रेकॉर्डींग चांगलंच व्हायरल झालं आहे.
अयोध्या पौळचा बांगर यांना इशारा
संतोष बांगर म्हणताहेत की, आम्हाला गद्दार म्हणायचं नाही, बंडखोर म्हणायचं नाही. तसं म्हटल्यास आमचे शिवसैनिक तिथे जाऊन त्यांच्या कानाखाली आवाज काढतील. मी उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांना जेवढं ओळखते, ते असं लोकांच्या पाठीत खंजिर खुपसणारे नाही आहेत. मला केवळ बांगर यांच्याकडून धमक्या आलेल्या नाहीत तर मला स्थानिक पातळीवरूनही धमक्या आल्या आहेत, अशी माहिती अयोध्या पौळ यांनी दिली.
मला धमक्या आल्या, मी आदित्य ठाकरेंना सांगितलं
मी आधी सर्वांच्या पोस्ट लिहायचे. मात्र जेव्हा मी बालाजी कल्याणकर यांच नाव घेऊन पोस्ट लिहिल्या. त्यानंतर मला भायखळ्यातून पोस्ट लिहिल्या तेव्हा मला भायखळ्यातून फोन आले. तुम्ही आमच्या मॅडमविरुद्ध लिहायचं नाही, अशी धमकी देण्यात आली. मात्र मी तोपर्यंत काहीच लिहिलं नव्हतं. मी अशी मुलगी आहे की, जी गोष्ट मला काही करू नको म्हणून सांगितलं जातं, ती गोष्ट मी आधी करते. काय करतील करून करून, पाय मोडतील, जीव घेतील. माझे आई-वडील म्हणतील की, लेकीने शिवसेनेसाठी स्वत:चा जीव दिला. तसं झालं तर माझ्यासारखं भाग्यवान कुणीच नसेल, असं अयोध्या पौळ म्हणाल्या.
जेव्हा मला भायखळ्यातून धमक्या आल्या तेव्हा मी सर्वप्रथम सेनाभवनला गेले. तिथे महिलांची मिटिंग होती. तिथे आदित्य ठाकरेंच्या कानावर ही गोष्ट घातली. तसेच दोन दिवसांनंतर २०८,२०९ मध्ये आदित्य यांची मिटिंग होती तेव्हा तिथे एका महिलेनं तू इथे कशाला आलीस म्हणून विचारणा करत, गैरवर्तन केलं. दरम्यान, उद्धव ठाकरेंसोबत जेव्हा मिटिंग झाली तेव्हा मी माझा जीव गेला तरी शिवसेनेची बाजू मांडणं थांबवणार नाही, असं स्पष्टपणे सांगितलं, असेही अयोध्या पौळ यांनी सांगितले.