- प्रसाद आर्वीकरहिंगोली : जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघांपैकी वसमत मतदारसंघातील लढत लक्षवेधक ठरत आहे. राजकीय गुरू आणि त्यांचे शिष्य दोघेही निवडणुकीच्या मैदानात आहेत. या निवडणूक रणसंग्रामात गुरू शिष्याला चितपट करणार का? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता रंगात आला असून, उमेदवारांच्या प्रचार दौऱ्यांनी मतदारसंघ ढवळून निघाला आहे. तिन्ही मतदारसंघांत तुल्यबळ लढती होत असल्या तरी वसमत येथील लढत वेगळी ठरत आहे. माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर यांना विद्यमान आमदार राजू नवघरे यांचे गुरू मानले जाते. जयप्रकाश दांडेगावकर यांनीच पुढाकार घेऊन २०१९ च्या निवडणुकीत एकसंघ असलेल्या त्यावेळच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून राजू नवघरे यांना उमेदवारी मिळवून दिली होती. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राजकारणात नव्या युवकांना अधिक प्रमाणात संधी मिळाली पाहिजे, असे आवाहन त्यावेळी केले होते. त्याला प्रतिसाद देत जयप्रकाश दांडेगावकर यांनी राजू नवघरे यांना उमेदवारी मिळवून दिली. त्या निवडणुकीत नवघरे हे विजयी झाले होते. त्यानंतरच्या राजकीय घडामोडीत राष्ट्रवादी काँग्रेसचे विभाजन झाले. महायुतीमध्ये असलेल्या अजित पवार गटात आ. राजू नवघरे हे सहभागी झाले. तर जयप्रकाश दांडेगावकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटातच थांबले.
आता कोण बाजी मारतो?यावेळच्या विधानसभा निवडणुकीत वसमत मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून आ. राजू नवघरे हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर हे आहेत. त्यामुळे या मतदारसंघात गुरू विरुद्ध शिष्य अशी लढत रंगणार आहे. त्यात आता कोण बाजी मारतो? याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.