गोरेगाव (हिंगोली) : अतिवृष्टीची मदत नाही, पीक विमापण मिळत नाही, अशा परिस्थितीत बिल थकबाकीमुळे विद्युतपुरवठा खंडित करण्यात आला आहे. मागील दोन ते अडीच महिन्यांपासून संपूर्ण गाव अंधारात आहे. यामुळे सेनगाव तालुक्यातील गारखेडा येथील संतप्त ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी विविध मागण्यांसाठी चक्क गावच विक्रीला काढत इच्छा मरणाची मागणी केली आहे. याबाबत मुख्यमंत्र्यांच्या नावाने असलेले निवेदन गोरेगाव पोलीस ठाण्यात १६ ऑक्टोबर रोजी देण्यात आले आहे.
चालू वर्षासह गत तीन वर्षांपासून सतत अतिवृष्टीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अशा परिस्थितीत विद्युत बिल थकले आहे. असे असताना वीज वितरण कंपनीकडून गारखेडा येथील विद्युतपुरवठा खंडित करण्यात आल्याने दोन ते अडीच महिन्यांपासून संपूर्ण गाव अंधारात आहे. परिणामी सण, उत्सवावर अंधाराचे सावट पसरले. विजेअभावी नागरी सेवा सुविधा बंद पडल्या असून शेजारच्या कडोळी गावातून पाणी व दळण दळून आणावे लागत आहे. वारंवार विनंती करूनही विद्युत पुरवठा सुरळीत केला जात नसताना संतप्त झालेल्या ग्रामस्थांकडून थेट गाव विक्री करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. पोलीस ठाण्यात दिलेल्या निवेदनावर स्वप्निल पाटील, अरुण पाटील, शामराव वाघमारे, प्रमिला वाघमारे, गणपत राऊत, नीलेश मेहकरे, पूजा वाघमारे, अरविंद मेहकरे, ज्योती वाघमारे, छाया वाघमारे, लक्ष्मी वाघमारे आदी ग्रामस्थांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा....अतिवृष्टीची मदत आणि पीक विमा लाभ मिळाला नाही. त्यातच वीज कंपनी व खाजगी फायनान्स कंपन्या वसुलीसाठी तगादा लावीत असल्याने शेतजमिनी व गुराढोरांसह गाव विक्री करीत असल्याचे निवेदनात म्हटले आहे. खंडित करण्यात आलेला विद्युत पुरवठा तत्काळ जोडण्यासह तत्काळ अतिवृष्टी मदतीसह पीक विम्याचा लाभ द्या, कोरोनाकाळात मृत्युमुखी पडलेल्या शेतकऱ्यांना मरणोत्तर कर्जमाफी द्यावी, संपूर्ण जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त घोषित करा, इच्छामरणाची परवानगी द्यावी, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.