हिंगोली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थांबविण्यात आलेले महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजनेतील आधार प्रमाणीकरण पुन्हा सुरू करण्यात आले आहे. या योजनेत आतापर्यंत शेतकऱ्यांना 395 कोटींचा लाभ देण्यात आला आहे.
हिंगोली जिल्ह्यात 96500 शेतकऱ्यांचे कर्ज खाते पात्र असल्याने वेबसाईटवर अपलोड केले आहेत अजून दहा हजार खाते शिल्लक आहेत. तर विशिष्ट क्रमांक प्राप्त झालेल्या शेतकऱ्यांची संख्या 87 हजार पाचशे आहे . यापैकी 66 हजार शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले आहे. मात्र 21000 शेतकऱ्यांचा आधार प्रमाणीकरण अजूनही बाकी आहे.या शेतकऱ्यांना त्यामुळे कर्जमुक्ती मिळाली नाही. आता या शेतकऱ्यांसाठी पुन्हा आधार प्रमाणीकरण सुरू करण्यात आले आहे.
मध्यंतरी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आधार प्रमाणीकरण बंद करण्यात आले होते. आता ही प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यात आली आहे. शिवाय शासनाकडून निधी नसल्याने प्रमाणीकरण करण्यास ब्रेक दिला होता. आता निधी उपलब्धतेची समस्या सुटली असल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण करून घेण्यास प्रारंभ केल्याचे दिसून येत आहे.