लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मातीतून उगवलेल्या रोपट्यापासून शेती करता येते; हा शोध जगाच्या पाठीवर स्त्रीयांनी लावला आहे. एकेकाळी भारतात मातृसत्ताक पद्धती होती. स्त्रीयांमध्ये वेदना पचविण्याची शक्ती आहे. म्हणूनच नवनिर्मितीची क्षमता माता आणि मातीत आहे, असे प्रतिपादन जिजाऊ व्याख्यानमालेचे प्रथम पुष्प गुंफताना ३ जानेवारी रोजी व्याख्यात्या प्रा. मनीषा रिठ्ठे यांनी केले.अॅड. ग्यानबाराव सिरसाट विचार मंच महावीर भवन येथे मराठा सेवा संघ व संलग्नित कक्षाच्या वतीने जिजाऊ व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. अध्यक्षस्थानी जिजाऊ ब्रिगेडच्या प्रदेशाध्यक्ष रेखाताई चव्हाण, उद्घाटक वन अधिकारी मनीषा पाटील, प्रमुख अतिथी कर सहाय्यक अधिकारी कांचन मुटकुळे, अॅड. सुनीता देशमुख, वर्षाताई सरनाईक, जिजाऊ ब्रिगेडच्या जिल्हाध्यक्षा ज्योतीताई कोथळकर, जयश्री घोडे आदींची उपस्थिती होती. प्रा. रिठ्ठे म्हणाल्या, सावित्री घडवायची असेल तर सर्वप्रथम पुरूषांनी ज्योतीबा होणे गरजेचे आहे. तत्कालीन परिस्थितीत सावित्रीबार्इंनी कष्ट केले. तुम्हा आम्हाला शिक्षणाची दारे खुली केली. पण सावित्रीने दिलेले शिक्षण आपण आज घेत नाही. केवळ कागदाची डिग्री म्हणजे शिक्षण नव्हे, कर्मकांडातून वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासणारं शिक्षण हवं.महिलांनी शेतीचा शोध लावला, नवनिर्मितीची क्षमता माता आणि मातीत असून यासाठी नवनिर्मिती सृजनशिलता वाढली पाहिजे, या गोष्टींचे पोषण केले पाहिजे, स्त्रीयांमध्ये वेदना पचविण्याची शक्ती आहे. मग ती कोणतीही असो. सती प्रथेपासूनचा जोहारापर्यंतचा प्रवास आजही २१ व्या शतकात बदलला नाही. केवळ स्त्रीमुक्तीच्या गप्पा सुरू आहेत. पण वास्तव मात्र वेगळे आहे. स्त्रीयांनी बालविवाह, सतीप्रथा या खडतर परंपरेतून प्रवास केला. पूर्वीची मानसिकता स्त्रीविकासाला आड येते. त्यामुळे स्त्रीयांनीही स्वत: सक्षम झाले पाहिजे. मुलांना संस्कारित करून महामानवांच्या विचाराची आदर्श पिढी घडविण्याचे काम महिलांवर आहे. आजही स्त्रीयांकडे संशयाच्या नजरेने पाहिले जाते. ती केवळ भोगवस्तू म्हणून वापरली जाते, अशी खंतही प्रा. त्यांनी व्यक्त केली. प्रत्येक स्त्री अथवा पुरूष वाईट नसतो, वाईट असते ती समाजमनातील मानसिकता. ही मानसिकता बदलणे गरजेचे असल्याचे त्या म्हणाल्या. सूत्रसंचालन ज्योती वारे, अर्चना कोकाटे यांनी केले. तर आभार राजश्री क्षिरसागर यांनी मानले.
नवनिर्मितीची क्षमता माता, मातीत आहे-रिठ्ठे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 12:02 AM