हिंगोली : मुदत संपलेले लर्निंग लायसन्स, फिटनेस प्रमाणपत्र, पासिंग यासह इतर कामांसाठी ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. दिलेल्या तारखेत लायसन्स काढून घेतले, तर ते वैध ठरू शकते, अन्यथा ते अवैध ठरण्याची दाट शक्यता असते.
१ सप्टेंंबर ते २१ सप्टेंबर या कालावधीत जवळपास ४०० लर्निंग लायसन्स काढली गेली, तर परमनंट लायसन्स ३५० काढली गेली आहेत. मागच्या काही महिन्यांपासून शासनाने प्रादेशिक परिवहन विभागाचा सर्व व्यवहार हा ऑनलाईन केला आहे. नेटवर्कमुळे बहुतांशवेळा यामध्ये अनेक अडचणी येत आहेत. लायसन्स काढण्यासाठी आधारकार्ड, पॅनकार्ड, जन्मतारखेचा दाखला आदीची पूर्तता करून, ते दिलेल्या वेबसाईटवर व्यवस्थितरित्या अपलोड केल्यास अडचणी येत नाहीत. यातील एकही प्रमाणपत्र राहिले तरी लर्निंग लायसन्सची तारीख मिळू शकत नाही.
काय आहेत अडचणी?
लर्निंग लायसन्स काढण्यासाठी जास्त करून नेटवर्क अडचणीचे ठरत आहे. शहरी भाग वगळता ग्रामीण भागात जास्त करून नेटवर्कच्या अडचणी येतात. पैसे खर्च करून ग्रामीण भागातील नागरिकांना शहराच्या ठिकाणी यावे लागते.
लायसन्स काढण्यासाठी सर्व कागदपत्रांची व्यवस्थितरित्या पडताळणी करणे गरजेचे आहे. आधारकार्ड व्यवस्थितरित्या काढले नसेल तर काढून घेणे गरजेचे आहे.
तारीख मिळाली तरी काही जण येत नाहीत...
काही उमेदवार असे असतात की, तारीख मिळाली तरी वेळेवर येत नाहीत. अशावेळी त्यांना परत प्रमाणपत्रांची पडताळणी करून ती अपलोड करावी लागतात. प्रमाणपत्र अपलोड केल्यानंतर तारीख उमेदवारांनी लक्षात ठेवणे गरजेचे आहे. जी तारीख मिळाली, त्या तारखेस येणे आवश्यक आहे. अन्यथा परत जाण्याची वेळ येते.
रोजचा कोटा ८०
लर्निंग व परमनंट लायन्सचा रोजचा कोटा ८० जवळपास आहे. कधी-कधी ५० च्या वर लायसन्स काढली जाऊ शकतात. कोरोना नियम पाळत सर्व उमेदवारांना लायसन्स दिले जाते.
लायसन्स नव्याने काढावे लागणार की काय?
लायन्सची मुदत संपून गेली आहे. दोनवेळा प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊनही आलो आहे. परंतु, संबंधितांची भेट झाली नाही, असे एका उमेदवाराने सांगितले.
लर्निंग लायसन्स असो किंवा इतर कोणतेही लायसन्स, सर्वच कामासाठी नेटवर्कच्या अडचणी येत आहेत. ग्रामीण भागातील उमेदवारांना तर याबाबत काहीच कळत नाही.
शासनाचा सर्व व्यवहार आजमितीस ऑनलाईन केला आहे. लायसन्ससाठी ३० सप्टेंबर ही तारीेख दिली आहे. उमेदवारांनी लायसन्स काढण्यासाठी सर्व कागदपत्रांची पूर्तता करूनच ते अपलोड करावे. काही तांत्रिक अडचणी आल्यासच प्रादेशिक परिवहन कार्यालयात यावे. उमेदवारांना अडचणी संकेतस्थळावर मांडता येऊ शकतात.
- जगदीश माने, सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी