मागील दोन-तीन आठवड्यांपासून भाजीपाल्यांची आवक जास्त असल्यामुळे भाजीपाला स्वस्त दरात मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये आनंद असला तरी उत्पादक मात्र चिंतित आहेत. रविवारी शहरातील भाजीमंडईमध्ये टोमॅटो १० रुपये किलो, कोथिंबीर ५ रुपये जुडी, मेथी १० रुपये जुडी, वांगे २० रुपये किलो, कद्दू १० रुपयास दोन, कोबी १० रुपये किलो, पालक १० रुपयांस दोन जुडी याप्रमाणे विक्री झाली. मागच्या आठवड्यात गाजर, दोडके, लिंबू, शेवगा शेंगा आदींची आवक जास्त होती. यावेळेस आवक कमी झाल्याने गाजर ३० रुपये किलो, दोडके ३० रुपये किलो, लिंबू ५० रुपये किलो, शेवगा शेंगा ६० ते ६५ रुपये किलो या दराने विक्री झाल्या. भाजीपाला स्वस्त दरात मिळत असल्यामुळे ग्राहकांची संख्या दोन- तीन आठवड्यांपासून वाढत असल्याचे भाजीपाला विक्रेत्यांनी सांगितले.
शेंगदाणा तेलात झाली वाढ
या आठवड्यात शेंगदाणा तेलात पाच रुपयांनी वाढ झाली. बाजारात शेंगदाणा तेल १२०, सोयाबीन १२०, तीळ तेल १३० रुपये किलोने विक्री झाले. साखर ३६, गूळ ४०, हरभरा डाळ ६०, मूग डाळ १००, तूर डाळ १०० रुपये किलोने विक्री झाल्याचे शे. आयुब शेख गनी यांनी सांगितले.
सफरचंद, टरबूज महागले
शहरात काळा अंगूर, हिरव्या अंगुराची आवक जास्त असून काळा अंगूर १०० रुपये किलो तर हिरवा अंगूर ८० रुपये किलोने विक्री होत आहे. आवक कमी असल्यामुळे सफरचंद १४० रुपये किलो, टरबूज ६० रुपये किलो, नाराळ ५० रुपयास एक, डाळिंब १८० रुपये किलोने विक्री झाले.
किराणा बाजार
शहरातील बाजारपेठेत तेलाव्यतिरिक्त तांदूळ ६० रुपये किलो, तीळ १३० रुपये किलो, शेंगदाणा १२० रुपये किलोने विक्री झाल्याचे पाहायला मिळाले. इतर वस्तूंचे भाव स्थिर असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.
प्रतक्रिया
यावर्षी जिल्ह्यात पाऊस चांगला झाला. सद्य:स्थितीत विहिरींना पाणी भरपूर प्रमाणात आहे. त्यामुळे भाजीपाल्यांचे उत्पादन जास्त निघत आहे.
-बळीराम लोणकर, भाजी विक्रेता, मंडई, हिंगोली
दोन ते तीन आठवड्यांपासून भाजीपाला स्वस्त दरात मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांत आनंद आहे. भाजीपाल्यासारखे फळांचे भाव उतरल्यास बरे होईल.
-रत्नमाला मोरे, गृहिणी, हिंगोली
सर्वच फळांची आवक या आठवड्यात कमीच आहे. त्यामुळे फळांचे दर वाढलेले आहेत. आवक वाढल्यास भाजीपाल्यासारखे स्वस्त दरात फळे मिळतील.
-महमद खाजा, फळ विक्रेता, हिंगोली