हिंगोली : प्रस्ताव मंजूर करून मुंबई कार्यालयात पाठविण्यासाठी १ हजार रूपयांची लाच स्वीकारणाऱ्या हिंगोली येथील अप्पर कोषागार अधिकाऱ्यास एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सदर कारवाई एसीबीच्या पथकाने ११ एप्रिल रोजी दुपारी ३.३५ वाजेच्या सुमारास केली.
सविस्तर माहिती अशी की, हिंगोली येथील जिल्हा कोषगार कार्यालयातील अप्पर कोषागार अधिकारी बंडू केशव सांडभोर (५०) यांनी तक्रारदार यांच्याकडे पैशाची मागणी केली. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना व डीसीपीएस (अंशदायी निवृत्ती योजनेतून तक्रारदाराने त्यांच्या आईच्या वैद्यकीय उपचाराकरीता २५ टक्के रक्कमेसाठी लेखी अर्ज केला होता. तक्रारदार हे शासकीय नोकर असून त्यांच्या कार्यालयाने सदरचा प्रस्ताव हा पुढील कार्यवाहीसाठी जिल्हा कोषागार कार्यालय हिंगोली येथे पाठविला.
परंतु अप्पर कोषागार अधिकारी बंडू सांडभोर यांनी सदरचा प्रस्ताव जिल्हा कोषागार अधिकाऱ्यांकडून मंजूरी घेण्याकरीता तसेच पुढील कार्यवाहीसाठी नॅशनल सिक्युरीटी डीपॉजीट लिमिटेड मुंबई या संस्थेकडून अखेरची मंजूरी मिळविण्याकरीता १ हजार रूपये लाचेची मागणी केली. परंतु तक्रारदार यांनी याबाबत रितसर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली. एसीबीच्या पथकाने सापळा रचून पडताळणी केली.
यावेळी वरील कामासाठी आरोपी लोकसेवक बंडू सांडभोर यांनी तक्रारदाराकडून एक हजार रूपये स्वीकारताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले. सदर कारवाई एसीबीचे पोलीस अधीक्षक संजय लाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपअधीक्षक रवींद्र थोरात, पोनि नितीन देशमुख, पोहेकॉ आढाव, अभिमन्यु कांदे, विजय उपरे, संतोष दुमाने, शेख जमीर, महारूद्र कबाडे, विनोद देशमुख, अवि किर्तनकार, ठाकरे आदींनी केली.