हिंगोली : घरफोडी प्रकरणात नऊ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीस स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १० जून रोजी रात्री हिंगोलीतून ताब्यात घेतले आहे. पुढील तपासासाठी आराेपीला हिंगोली ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
हिंगोली ग्रामीण पोलीस ठाण्यात २०१२ मध्ये घरफोडीची घटना घडली होती. याप्रकरणी शिवा विठ्ठल काळे (रा. पारधीवाडा, हिंगोली) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. या घटनेनंतर शिवा काळे फरार झाला होता. त्याच्यावर परभणी, हिंगोली जिल्ह्यात इतर गुन्हे दाखल होते. पोलीस त्याच्या मागावर होते. अखेर १० जून रोजी तो हिंगोलीत एका नातेवाइकाकडे आल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्यावरून पोनि. उदय खंडेराय यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक किशोर पोटे यांच्या नेतृत्वाखाली बालाजी बोके, ज्ञानेश्वर पायघन, राजू ठाकूर, टापरे यांच्या पथकाने छापा टाकून शिवा काळे यास ताब्यात घेतले. त्यानंतर पुढील तपासासाठी त्याला हिंगोली ग्रामीण पोलिसांकडे सुपुर्द करण्यात आले.