हिंगोली : शहरातील खाजगी डॉक्टरांची सेवा अधिग्रहित करून त्यांना शासकीय रुग्णालयातील कोविड व नॉन कोविडच्या कामासाठी पाचारण करण्यात आले आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश काढले आहेत. आज जिल्हा सामान्य रुग्णालयात आॅक्सिजन प्लांट व प्रयोगशाळेच्या कामाचीही पाहणी केली.
हिंगोली शहरात अनेक डॉक्टर रुग्णालयात पूर्णवेळ सेवा देत नसल्याचे समोर येत आहे. शिवाय आता वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता एकाही डॉक्टरने कोविड रुग्णालय उभारले नाही. अशा परिस्थितीत शासकीय रुग्णालयातील सेवांवर परिणाम होवू नये, यासाठी या डॉक्टरांच्या सेवा अधिग्रहित केल्या आहेत. कोविडच्या वाढत्या रुग्णांमुळे जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांना या ठिकाणी नियुक्त केले जात आहे. क्वारंटाईन सेंटर, कोविड वार्ड, रुग्ण तपासणी, थ्रोट स्वॅब घेणे, रुग्णाच्या संपर्कातील लोकांचा शोध घेणे, त्यांना क्वारंटाईन करणे, अँटीजन तपासणी करणे आदी वेगवेगळ्या बाबींसाठी मनुष्यबळ अपुरे पडत असल्याने सामान्य रुग्णालयाच्या नियमित ओपीडीचाही बहुतांश स्टाफ तिकडे वर्ग केला आहे. त्यामुळे खाजगी डॉक्टरांना एकतर नॉन कोविड अथवा कोविड वार्डात काम दिले जाणार आहे.
याबाबत जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी म्हणाले, खाजगी डॉक्टर कोविड काळात फारसे योगदान देत नाहीत. रुग्णांना घेत नसल्याच्याही तक्रारी वाढल्या आहेत. त्यांचे रुग्णही जिल्हा रुग्णालयात रेफर करीत आहेत. शिवाय काळजीपोटी ते पुन्हा पुन्हा विचारणा करीत आहेत. अनेकदा यामुळे बाहेर चुकीचा संदेश जात आहे. या सर्व बाबींसह जिल्हा रुग्णालयातील कामकाज सुरळीत चालण्यासाठी हे पाऊल उचलले आहे. ज्यांना भविष्यात आपले कोविड रुग्णालय सुरू करायचे, अशांना या ठिकाणी अनुभव घेता येईल. जे वयस्कर व गंभीर आजारांनी ग्रस्त आहेत, अशांना कोविडसाठी नेमले जाईल. उर्वरित नॉन-कोविडसाठी काम करतील. जिल्हा रुग्णालयात प्रसूतींचे प्रमाणही मोठे आहे. या ठिकाणीही वेगळा कक्ष निर्माण केला आहे. तेथेही खाजगी सेवा अधिग्रहित करण्याचा प्रयत्न आहे. यावेळी डॉ.दीपक मोरे, कार्यकारी अभियंता बाने आदी उपस्थित होते.
कर्मचाऱ्यांना येताहेत धमक्यायावेळी जिल्हा रुग्णालयातील परिचारिकांनीही आपली गाऱ्हाणी मांडली. आम्हाला रुग्णांच्या बाहेरील नातेवाईकांकडून औषधी व स्वतंत्र खोलीसाठी भ्रमणध्वनीवरून धमक्या येत असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी म्हणाले, बाहेरच्या लोकांनी अशाप्रकारे त्रास देणे चुकीचे आहे. या ठिकाणी स्टाफ चांगले काम करीत आहे. तपासणी करूनच योग्य औषधी देतात. काहींची अवाजवी मागणी असते. ती पूर्ण करायला हा भाजीपाला नाही. तर उपलब्धतेनुसार बेड सर्वांनाच मिळणार आहेत. त्यात कुणाची पसंती चालणार नाही.
प्रयोगशाळेची पाहणी; लवकरच टँक उभारणीसध्या हिंगोलीच्या सामान्य रुग्णालयात आॅक्सिजन टँकसाठी खोदकाम सुरू असून मशिनरी आल्यावर हा प्लांट लवकरच कार्यान्वित होणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी या ठिकाणी पाहणी करून माहिती घेतली.४गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आरटीपीसीआर टेस्ट तपासणीच्या प्रयोगशाळेच्या कामाचीही त्यांनी पाहणी केली. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे काम होणे अपेक्षित असताना त्यासाठी अपेक्षित फरशी मिळत नसल्याने रखडले होते. आता मशिनरी येताच हे काम पुढील आठवड्यात पूर्ण होईल, असे सांगण्यात आले.४जिल्हा सामान्य रुग्णालयातील भेटीबाबत ते म्हणाले, या ठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांना घेऊन विविध गैरसोयी दूर करण्यासाठी आवश्यक त्या सूचना दिल्या आहेत. छताची दारे तुटल्याने वानरे घुसून त्रास देतात. नासधूस करतात. त्यासह प्रयोगशाळा, आॅक्सिजन टॅँक आदीच्या कामाला गती देण्यास सांगितले. दरम्यान, कार्यकारी अभियंता बाने यांना कामाची गती मंद असल्याबाबत चांगलेच सुनावले.