हिंगोली : सेनगाव तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेची आरोग्य सेवा सांभाळणारी आरोग्य यंत्रणा वैद्यकीय अधिकार्यांच्या रिक्त पदांमुळे ढेपाळली आहे. तालुक्यातील चार प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्यांची तब्बल सहा पदे अनेक दिवसांपासून रिक्त आहेत.
शासनाने ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्य सांभाळण्यासाठी ३० हजार लोकसंख्येमागे एक प्राथमिक आरोग्य केंद्र देण्याचे धोरण ठरविले आहे. जवळपास २ लाख १० हजार लोकसंख्या असलेल्या सेनगाव तालुक्यात या निकषाची अंमलबजावणी झालीच नाही. प्राथमिक आरोग्य केंद्रात मंजूर वैद्यकीय अधिकार्यांची पदे वर्षानुवर्षे रिक्त राहत असल्याची शोकांतिका आहे. तालुक्याची एकूण लोकसंख्या जवळपास २ लाख १० हजार असून तालुक्यात गोरेगाव, कवठा, साखरा, कापडसिंगी हे चार प्राथमिक आरोग्य केंद्र तर पानकनेरगाव, पुसेगाव हे प्राथमिक पूर्वउपचार केंद्र कार्यरत आहेत. तसेच दोन वर्षांपूर्वी ब्रह्मवाडी व भानखेडा या दोन नव्या प्राथमिक आरोग्य केंद्रांना शासनाने मंजुरी दिली आहे. तर आजेगाव येथे नवीन प्रा.आ. केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहे.
या तिन्ही प्रा.आ. केंद्रांचे घोडे कागदोपत्रीच दामटले जात असून ते पुढे सरकले नाही. अशा स्थितीत आहेत त्या प्राथमिक आरोग्य केंद्राची स्थिती दयनिय झाली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी नसल्याने आरोग्य सेवा नावालाच उरली आहे. आरोग्य केंद्रात उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी नसल्याने तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्राकडे रूग्णांनीही पाठ फिरविली आहे.गोरेगाव प्रा.आ. केंद्रात वैद्यकीय अधिकार्यांच्या एकूण तीन पदांपैकी एक पद रिक्त आहे. कौठा येथील केंद्रात दोनपैकी एक पद रिक्त आहे. तर साखरा प्रा.आ. केंद्रात तीन पदांपैकी एक पद रिक्त आहे. तर कापडसिंगी प्रा.आ. केंद्रातील दोन्ही वैद्यकीय अधिकार्यांची पदे एक वर्षापासून रिक्त आहेत.
तालुक्यातील सर्वच प्रा.आ. केंद्रात वैद्यकीय अधिकार्यांची पदे रिक्त असल्याने त्याचा परिणाम आरोग्य सेवेवर होताना दिसत आहे. तालुक्यातील संस्थात्मक प्रसुती, कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया, लसीकरण, साथरोग उपाययोजना यासह अन्य उपचार सुविधांवर याचा परिणाम जाणवत असून वैद्यकीय अधिकार्यांची रिक्त पदे भरण्याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासनानेही दुर्लक्ष केले आहे.
पाठपुरावा केला जात आहे सेनगाव तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकार्यांची एकूण १२ पदे मंजूर आहेत. त्यापैकी सहा पदे रिक्त आहेत. ही रिक्त असलेली पदे भरण्यासाठी जि.प.कडे पाठपुरावा केला जात असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांनी दिली आहे.
रूग्णांची गैरसोयवैद्यकीय अधिकार्यांची अनेक पदे रिक्त असल्याचा परिणाम रूग्ण सेवेवर होताना दिसत आहे. त्यामुळे रूग्णांची गैरसोय होत असून उपचारासाठी रूग्णांना खाजगी रूग्णालयात उपचार घ्यावे लागत आहेत.