हिंगोली : जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी आगामी खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना चांगल्या गुणवत्तेच्या कृषी निविष्ठा उपलब्ध करून द्याव्यात, तसेच एमआरपीपेक्षा जास्त दराने विक्री करू नये, चढ्या दराने विक्री केल्यास विक्रेत्यावर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी दिला.
खरीप हंगाम २०२१च्या अनुषंगाने जिल्ह्यातील कृषी निविष्ठा विक्रेत्यांची २६ एप्रिल रोजी व्हिडिओ कॉन्फरन्स जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी ते बोलत होते. यामध्ये जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी व्ही. डी. लोखंडे, कृषी विकास अधिकारी एन. आर. कानवडे, जिल्हा सीड्स पेस्टीसाईड, डिलर्सचे अध्यक्ष निलावार यांच्यासह कृषी विभागातील अधिकारी, विक्रेत्यांनी सहभाग नोंदविला. यावेळी लोखंडे व कानवडे यांनीही मार्गदर्शन केले. कृषी सेवा केंद्रचालकांनी शेतकऱ्यांना कृषी निविष्ठांचे पक्के बिल देणे, खताची विक्री करताना पॉस मशीनमार्फत विक्री करावी, जुन्या दराचे खत जुन्याच दराने विक्री करावे, दर्शनी भागात भाव फलक लावावा, कृषी निविष्ठांची विक्री करताना सोशल डिस्टन्सचे पालन करावे, सॅनिटायझर उपलब्ध करून ठेवावे, मास्क वापरावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. तसेच शेतकऱ्यांनी पेरणी करताना रासायनिक खताचा (विशेषत: युरिया)वापर कमीच करावा, सोयाबीनचे घरगुती बियाणे जास्तीत जास्त प्रमाणात पेरणीसाठी वापरावे, असे आवाहनही त्यांनी केले.