सेनगाव ( हिंगोली ) : शहरात विविध ठिकाणी शासकीय जमिनीवर अनेक वर्षांपासून असलेल्या व्यावसायिक अतिक्रमणाविरोधात गुरुवारी तहसील कार्यालय व नगर पंचायत प्रशासनाने धडक कारवाई केली. या कारवाईत 100 हुन अधिक लहान-मोठ्या दुकानावर हातोडा फिरवण्यात आल्याने आता हा परिसर मोकळा झाला आहे.
मागील अनेक दिवसांपासून शहरातील विविध ठिकाणच्या अतिक्रमणावरील कारवाईचा मुद्दा चर्चेला होता. यात सर्वात जास्त अतिक्रमण हे मुख रस्त्यावर होते. मुख्य रस्त्यावर असलेल्या गट.956 शासकीय जमिनीवर मागील अनेक वर्षांपासून विविध स्वरूपाचे अतिक्रमण करण्यात आले. यात व्यवसायिक दुकाने अधिक होती. यावर आज सकाळी तहसील व नगर पंचायत प्रशासनाने थेट कारवाई केली.
कसलाही दबाव न घेता प्रशासनाने आज सकाळी ८ वाजेपासून कारवाईला सुरुवात केली. यावेळी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त करण्यात आला. कारवाईत कृषी उत्पन्न बाजार समिती समोर अनेक वर्षांपासून असलेले अतिक्रमण तसेच आठवडी बाजार व पोलीसठाण्या समोरील अतिक्रमण काढण्यात आले.
रात्रीच काढली काही अतिक्रमणे अतिक्रमणे निघणारच हे हे लक्षात येताच कारवाईच्या पूर्वसंध्येलाच अनेक टपरी धारकांनी स्वतःहून आपले अतिक्रमण काढुन घेतले. पक्के बांधकाम असलेले अतिक्रमण पोलीस बंदोबस्तात काढण्याचे काम चालू होते. या कारवाईत उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, तहसीलदार वैशाली पाटिल, मुख्याधिकारी शैलेश फडसे, पोलीस निरीक्षक मधुकर कारेगावकर, महसूल व नगर पंचायतचे कर्मचारी यांच्या सह 50 पोलिस सहभागी झाले आहेत.