हिंगोली: गत दोन वर्षांत ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ अंतर्गत ‘ब्रेथ ॲनालायझर’ द्वारे पोलिसांनी ७६ जणांवर कारवाई केली. कोरोना काळातील नऊ महिन्यांमध्ये मात्र तळीराम दारूपासून वंचित राहिल्याचे पहायला मिळाले.
जिल्ह्यातील शहर वाहतूक शाखेकडे दोन ‘ॲनालायझर’ मशीन असून या मशीनद्वारे दारू पिऊन वाहने चालविणाऱ्यांची तपासणी करण्यात आली. तपासणीअंती दोन वर्षांत ७६ जणांवर कारवाई करण्यात आली. काही तळीराम वाहने चालविताना इतके तर्रर्रर्र होतात की, स्वत:वरचा कंट्रोलही ते गमावून बसतात. अशावेळी ते स्वत:बरोबर इतरांचाही जीव घेतात. दारू पिऊन वाहने चालविणे हा कायद्याने गुन्हा असून काही तळीराम मात्र हौसेखातर भरपूर प्रमाणात दारू ढोसतात. त्यामुळे मोठे अपघात घडतात. ‘ड्रंक अँड ड्राईव्ह’ या अंतर्गत पोलिसांनी कारवाई करीत २०१९-२० या दोन वर्षांत ७६ जणांवर कारवाई केली आहे. पोलिसांनी ‘ब्रेथ ॲनालायझर’ द्वारे जिल्ह्यातील हिंगोली ग्रामीण, कळमनुरी, आखाडा बाळापूर, औंढा नागनाथ, वसमत ग्रामीण, कुरुंदा, बासंबा, गोरेगाव, सेनगाव, नर्सी तसेच शहरातील गांधी चौक, इंदिरा चौक, शिवाजी चौक, रेल्वे गेट, अकोला बायपास, खटकाळी मार्ग आदी ठिकाणी तपासणी केली.
ही कारवाई पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली किरण चव्हाण, शेषराव राठोड, रावसाहेब घुमनर, दिगंबर कापसे, चंद्रकांत मोटे, सागर जैस्वाल, रवी गंगावणे, वसंत चव्हाण, फुलाजी सावळे, गजानन राठोड, सुभाष घुगे, शिवाजी पारसकर, गजानन सांगळे, रमेश ठोके, विकास गवळी, बळीराम शिंदे, तान्हाजी खोकले, अमितकुमार मोडक, गजानन राठोड, कैलास घुगे, चंद्रशेखर काशिदे, सुषमा भाटेगावकर, भारती दळवे यांनी केली.
आश्चर्यम ! नऊ महिने ड्रंक अँड ड्राईव्ह केले नाही
आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कोरोनाकाळात दारूची दुकाने बंद असल्यामुळे तळीरामांना दारूच मिळाली नाही. तळीराम रोजच्याप्रमाणे सकाळी उठून दुकानांसमोर जायचे. परंतु, दुकान बंद असल्याचे लक्षात येताच घरी परतायचे. नऊ महिने तळीराम दारूपासून दूर राहिल्याचे पहायला मिळाले.
प्रतिक्रिया
दारू पिऊन वाहने चालविणे हा कायद्याने गुन्हा आहे. दारू पिऊन कोणी गाडी चालविली तर त्याच्यावर नियमाप्रमाणे कारवाई केली जाते. तेव्हा वाहनचालकांनी नियमांचे पालन करावे.
-ओमकांत चिंचोलकर, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा