जवळा बाजार : वसमत तालुक्यातील परळी (दशरथे) येथील पूर्णा नदी पात्रात २९ जानेवारी रोजी पूर्णा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर हट्टा पोलिसांनी कारवाई केली आहे.
मागील काही दिवसांपासून पूर्णा नदी पात्रातून ढवूळगाव, माटेगाव, परळी या ठिकाणावरून मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळू उपसा सुरू आहे. याकडे मात्र महसूल विभागाचे चक्क दुर्लक्ष दिसून येत आहे. पूर्णा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती हट्टा पोलिसांना मिळाली असता पोलिसांचे पथक परळी (दशरथे) येथील पूर्णा नदी पात्रात पोहोचले. यावेळी दोन विना क्रमांकाचे ट्रॅक्टर अवैधरित्या वाळूची वाहतूक करीत असल्याचे आढळून आले.
यावेळी पोलिसांनी या दोन्ही वाहनांवर कारवाई करून गुन्हा दाखल केला. यामध्ये विना क्रमांकाचे ट्रॅक्टर ट्रॉलीसह अंदाजे किंमत ५ लाख ५० हजार रुपये व एक ब्रास वाळू अंदाजे किमत पाच हजार रुपये, तर दुसरे ट्रॅक्टर ट्रॉलीसह अंदाजे किंमत ५ लाख ५० हजार व एक ब्रास वाळू अंदाजे किंमत पाच हजार असा एकूण ११ लाख १० हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
याबाबत पोलीस नायक शेख मदार शेख सरवर यांनी हट्टा पोलिसात फिर्याद दिली. प्रसाद गुलाबराव काळे, सुभाष रंगराव काळे, ओमकार उत्तमराव काळे, बाळू उर्फ नारायण गंगाधर गरूड (रा. जोडपरळी, ता. जि. परभणी) यांच्याविरुद्ध वाळू चोरी प्रकरणी हट्टा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, ही कारवाई सपोनि गजानन मोरे, आकाश सरोदे, इम्रान कादरी, जीवन गवारे, अरविंद गजभार, महेश अवचार, महेश गर्जे, गणेश लेकुळे, चालक लाखाडे यांनी केली आहे.