हिंगोली : रेल्वेस्थानकावर गुरुवारी औरंगाबाद येथून रेल्वे न्यायालय आले होते. यावेळी त्यांनी रेल्वेस्थानकावर विनातिकीट, महिला डब्यात प्रवास करणा-यांना ताब्यात घेण्यात आले. न्यायालयाने यावेळी ७३ जणांवर कारवाई केली यात ४२ हजाराचा दंड वसूल झाला.१७ वर्षांनंतर पहिल्यांदाच हिंगोली रेल्वे स्टेशनवर अशी धडकेबाज कारवाई करण्यात आल्याने रेल्वे पोलिसांची चांगलीच दहशत निर्माण झाली आहे.
हिंगोलीतील रेल्वेस्थानकावर नेहमीच दाद-याचा वापर न करता, रेल्वे वेळेतही रेल्वे रुळ ओलांडून प्रवासी एका प्लॅटफॉर्मवरुन दुस-या प्लॅटफॉर्मवर जातात. उघड्या डोळ्याने हे सगळे पाहात उभे असलेल्या रेल्वे पोलिसांनी कधीच यावर कारवाई केली नाही. मात्र, गुरुवारी कोर्ट येणार असल्याने की काय? अशी कारवाई प्रथमच झाली. शिवाय कारवाईचा आकडा वाढविण्यासाठी तर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरील तिकीटघर बंद ठेवले नाही ना? असा आरोप प्रवाशांतून करण्यात आला.
तपासणीच्या धास्तीनेच प्रवासी टिकीट काढण्यासाठी प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरील तिकीट खिडकीकडे धाव घेत होते. मात्र त्यांना दादा-यावरुन उतरताच क्षणी ताब्यात घेतले जात होते. यामध्ये शालेय विद्यार्थ्यांचाही मोठ्या प्रमाणात समावेश होता. ते पोलीस कर्मचा-यांना तिकिट काढण्यासाठी जात असल्याचे सांगत होते. मात्र त्यांचे ऐकून घेतले जात नव्हते. त्यांना पकडून थेट प्रतीक्षालयात कोंबून त्यांच्या नावाची नोंदणी केली जात होती. यातून सुटका करुन घेण्याचा अनेक जण प्रयत्न करीत होते. या प्रकारानंतर अनेकांनी यावरून संताप व्यक्त केला. तर रेल्वेने दाद-यावरून पाय-या कशासाठी ठेवल्या, असा सवालही व्यक्त केला.
आॅटोवाल्यांनाही केला दंडपरिसरात अस्ताव्यस्त लावलेल्या आॅटोवरही कारवाई केल्याने, चालकांमध्ये एकच खळबळ उडाली. ही कारवाई पूर्णा येथील रेल्वे सुरक्षा बलाच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक एस. डी. बोरकर, स. फौजदार तात्याराव पिवळ, , जीआरपीएफ, रेल्वे पोलीस गणेश जाधव, राठोड, जोगदंड, घुगे, यादव, शेख जावेद, कांबळे, काठोरे आदींनी केली.
विद्यार्थ्यांची गोचीफुकट्या प्रवाशांना या कारवाईत दणका बसला हे चांगलेच झाले. मात्र, यात दाद-यावरून उतरून तिकीट घेण्याच्या नादात अनेक विद्यार्थीही भरडले गेले. खिशात पैसे नसल्याने अनेकांची गोची झाली.
४२, ४०० रुपयांचा दंड वसूल
रेल्वेस्थानकावर १७ वर्षांच्या कालावधीनंतर पहिल्यांदाच प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी रेल्वे कोर्ट औरंगाबाद यांच्या कॅप कोर्ट रेल्वे सुरक्षा बल व रेल्वे पोलीस हिंगोलीच्या वतीने कोर्ट कॅम्पचे आयोजन झाले. यावेळी प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एम. ए. हुसेन यांच्यासमोर रेल्वे अॅक्ट कलम १४४, १४५, १५९, १४५ बी, १५५, १६२, १६७ नुसार साधे तिकिट घेऊन आरक्षित डब्यातून प्रवास करणे, डब्यात धूम्रपान करणारे, अनधिकृत फेरीवाले, नो पार्र्किं ग झोनमध्ये आॅटो उभे करणारे व तृतीयपंथी अशा एकूण ७३ जणांवर रेल्वे अॅक्ट नुसार कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून ४२ हजार ४०० रुपयाचा दंड वसूल केला.
पहिल्यांदाच झालेल्या या कारवाईने रेल्वेस्थानक परिसरात एकच खळबळ उडाली होती. तसेच वेग वेगळ्या कलमान्वये लावण्यात आलेल्या दंडामुळे अशाही कारवाया होत असल्याचा अनुभव ब-याच प्रवाशांना पहिल्यांदा आला. त्यामुळे आता रेल्वेमध्ये कोणीही विनातिकिट प्रवास करणार नाही, अशी धास्ती निर्माण झाला. तर रेल्वे परिसरात आॅटो लावताना विचार करावा लागणार आहे. कधी नव्हे, आज झालेल्या कारवाईने मात्र रेल्वेचे नियमित उत्पन्न वाढण्यास मदत होणार, हे मात्र खरे!