हिंगोली : कुरूंदा येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी होणार्या निवडणुकीवरून झालेल्या हाणामारीत काहींना तलवारीचे मार लागले तर अनेक दुचाकी व चारचाकी वाहनांची नासधूस झाली आहे. त्यामुळे वार्र्ड ६ च्या परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, रविवारी रात्रीला ११.३० वाजता ही घटना घडली आहे.
कुरूंदा येथील ग्रामपंचायतीच्या एका जागेसाठी वार्ड क्र. ६ मध्ये अस्तित्वाची लढाई होत आहे. तालुक्याचे मुख्य केंद्रस्थान असल्याने व गावात प्रमुखपदे असल्यामुळे कुरूंद्यात वर्चस्व कोणाचे या निवडणुकीत स्पष्ट होणार असल्याने नेत्यांनी प्रतिष्ठापणाला लावली आहे. त्यामुळे वार्ड क्र. ६ मध्ये कार्यकर्त्यांचा जत्था प्रचाराला उतरल्याने प्रचाराला आगळेवेगळे स्वरूप आले आहेत. रविवारी रात्री ११.३० च्या सुमारे प्रचार करीत असताना कार्यकर्ते एकमेकासमोर भिडले. शाब्दीक चकमकीवरून हाणामारीची घटना घडली. या हाणामारीत काहींना तलवारीचे मार देखील लागले. वाढलेल्या गोंधळामुळे काहीचार चाकी व १० ते १२ दुचाकीवर दगडफेक झाली. काठ्यांनी काही गाड्यांच्या काचा फोडल्या. या घटनेमुळे वार्ड क्र. ६ मध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर घटनास्थळी डिवायएसपी शशिकिरण काशिद यांनी भेट देवून पाहणी केली. त्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आली. या प्रकरणी उशिरापर्यंत दुसर्या दिवशीही गुन्हा दाखल झाला नव्हता. या घटनेची पोलीस डायरीमध्ये नोंद झालेली होती. मंगळवारी मतदान होणार असल्याने तणाव परिस्थितीमुळे मोठा फौजफाटा तैनात करण्यात येणार आला होता.
कुरूंद्यात निवडणुकीवरून प्रथमच कार्यकर्त्यांमध्ये राडा झाला आहे. प्रतिष्ठेच्या निवडणुकीमुळे हाणामारीपर्यंत घटना घडल्याने निवडणूक तणावाच्या वातावरणात झाली. सध्या तणावपूर्ण गावात शांतता असून कुरूंदा पोलिसांनी फिरते पथक तैनात करून परिस्थितीवर नियंत्रण ठेवून आहेत. एका जागेसाठी होत असलेल्या या निवडणुकीत तणाव निर्माण झाल्याने या निवडणुकीकडे आता हिंगोली जिल्ह्याचे लक्ष लागलेले आहे.