दयाशील इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या घटनांत दिवसेंदिवस वाढ होत आहे. हिंगोली शहरासह ग्रामीण भागातील मोटारसायकली चोरीस जात असल्याने जिल्ह्यात दुचाकी चोरटयांची टोळी तर सक्रीय झाली नाही ना? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. घरसमोरील तसेच भर बाजारातून वाहने लंपास केली जात असल्याने वाहनधारकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.मागील महिनाभरापासून जिल्ह्यात मोटारसायकल चोरीच्या घटनांत वाढ झाल्याने नागरिकांत भीती निर्माण झाली आहे. पोलिसांकडून चोरट्यांचा शोध मात्र सुरूच आहे. दाखल झालेल्या अनेक गुन्ह्यांत तपास सुरूच असल्याची माहिती सांगण्यात येत आहे. वाहने चोरीस गेल्या प्रकरणी हिंगोली शहर ठाण्यासह विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हेही दाखल आहेत. जिल्ह्यात दुचाकी चोरीच्या अनेक घटना घडत असल्या तरी ही चोरट्यांची टोळी बाहेरीलच आहे, असेही म्हणता येणार नाही. वाहन चोरट्यांचा पोलिसांनी शोध घेणे गरजेचे आहे. नागरिकांनीही दक्ष राहणे महत्त्वाचे आहे. मोठ्या शिताफीने हे चोरटे हँन्डल लॉक केलेली वाहने लंपास करीत आहेत. या प्रकारामुळे मात्र दुचाकी चोरट्यांना खाकीचा धाकच राहिला नसल्याचे दिसून येत आहे.दुचाकी चोरी प्रकरणातील किती वाहनांचा शोध लागला आहे, याची आकडेवारीही पोलीस प्रशासनाकडे उपलब्ध नाही. जिल्ह्याभरात हे चोरीचे सत्र सुरूच आहे. याला लगाम लावणे गरजेचे असून वाहने चोरणाऱ्या टोळीला जेरबंद करण्याची आवश्यकता असून तशी मागणीही जनतेतून केली जात आहे. वाहने चोरीच्या घटनामुळे मात्र भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस प्रशासनाकडून चोरट्यांचा शोधच सुरू आहे.
जिल्ह्यात दुचाकी चोरट्यांची टोळी सक्रिय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2018 1:05 AM