दयाशील इंगोले ।लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : जागतिक जल दिनाचा प्रशासनाला विसर पडला की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. २२ मार्च रोजी जागतिक जल दिन आहे. जलदिनानिमित्त इतर जिल्ह्यात जलजागृतीसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे, तर कुठे साप्ताहिक कार्यक्रम घेण्यात येणार आहेत. मात्र हिंगोली येथे जल जागृतीनिमित्त कुठल्याच कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नाही.वातावरणातील बदलामुळे पर्जन्यमान कमी झाले आहे. परिणामी पाणी टंचाईचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन आणि त्याच्या वापराबाबत जनजागृतीची आवश्यकता आहे. दिवसेंदिवस पाण्याचा होणारा अपव्यय टाळण्यासाठी शासनस्तरावरून विविध उपक्रम किंवा योजनाही राबविल्या जातात. या उपक्रमाच्या माध्यमातून पाण्याचे महत्त्व नागरिकांना सांगितले जाते. परंतु जबाबदार प्रशासनाला जल जागृतीचा विसर पडल्याचे चित्र आहे. हिंगोली येथील जि. प. च्या ्रग्रामीण पाणी पुरवठा विभागातर्फेही जल दिनानिमित्त विशेष असे काही कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले नाही. याबाबत संबधित अभियंता प्रशांत दासरवार यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता त्यांनी जल दिनानिमित्त अजून तरी काही जलजागृतीची मोहीम हाती घेण्यात आली नसून याबाबत वरिष्ठांकडून माहिती मिळाल्यास कळविली, जाईल असे सांगितले. तसेच जि. प. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण या विभागातर्फेही जलजागृतीसाठी विशेष काही कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नाही. याबाबत तसे काही शासनाकडून सूचनांचे पत्रही आमच्या कार्यालयास प्राप्त झाले नाही, असे येथील कार्यरत काही कर्मचाऱ्यांनी सांगितले.विशेष म्हणजे वन विभागामार्फतही जागतिक जल दिनानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले नसल्याचे दिसून आले. विभागीय वनाधिकारी केशव वाबळे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता, ते बैठकीत होते. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही. संबधित विभागातर्फेच जर जल साक्षरता संदर्भात जलजागृतीचे कार्यक्रम होणार नसतील तर इतर विभागांचे जागतिक जल दिनानिमित्त काय नियोजन असेल, असा प्रश्न जलप्रेमींतून उपस्थित केला जात आहे.जलजागृतीचा जागर४२२ मार्च हा दिवस जागतिक जल दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून पाण्याचे महत्त्व नागरिकांना पटवून देणे, तसेच जल साक्षरतेसाठी पाण्याचे नियोजन करणे, पाण्याचा अपव्यय टाळून त्याचा काटकसरीने वापर करण्या संदर्भात विविध कार्यक्रम किंंवा उपक्रम राबविणे आवश्यक आहे. जिल्ह्यात जलजागृतीचा जागर व्हावा यासाठी शासनस्तरावरून विविध उपक्रम राबविणे गरजेचे आहे. परंतु इतर दिन जसे साजरे होतात, किंवा त्या दिवशी विविध कार्यक्रम घेण्याचे नियोजन केले जाते तसे मात्र जल दिनी होत नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे जलजागृतीबाबत अधिक जनजागृतीची आवश्यकता आहे.
‘जागतिक जल दिन’ चा प्रशासनाला विसर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2019 11:33 PM