अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांनी अर्ज करावा
हिंगोली : आदिवासी विकास विभागांतर्गत अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शहरातील नामांकित इंग्रजी शाळेत शिक्षण घेण्यासाठी सन २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात इयत्ता पहिली व दुसरीमध्ये प्रवेश देण्यात येणार आहेत. त्याअनुषंगाने एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या पालकांनी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, कळमनुरी येथे १० मार्चपर्यंत अर्ज करावा.
पालकांनी अर्जासोबत जातीचा दाखला, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न रु. १ लक्ष रुपयेपर्यंत, उत्पन्नाचे प्रमाणपत्र संबंधित तहसीलदार यांचे जोडावे. विद्यार्थ्यांचे वय जून-२०२१ पर्यंत ६ वर्ष पूर्ण असावे व त्याबाबतचे विद्यार्थी जन्म प्रमाणपत्र संबंधित ग्रामपंचायत, नगरपालिका यांचे असावे. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, दोन पासपोर्ट साइज फोटो व पालकाचे सहमतीपत्र इ. कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे. अपंग, विधवा, घटस्फोटित, निराधार व परित्यक्त्या आदी पालकांच्या पाल्यांना प्राधान्य देण्यात येईल तसेच शासकीय, निमशासकीय नोकरदारांच्या पाल्यांना सदर योजनेचा लाभ अनुज्ञेय नाही. इंग्रजी माध्यमाच्या नामांकित शाळेमध्ये प्रवेश घेण्याकरिता विहीत कालावधीत अर्ज सादर करण्याचे आवाहन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी डॉ. विशाल राठोड यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.