हिंगोली: कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शहरासह जिल्ह्यातील जारच्या पाण्याची मागणी घटल्याचे दिसून येत आहे. घरचे साधे पाणी परवडले; पण कोरोना काळात जार नको, अशी प्रतिक्रिया काही नागरिकांनी व्यक्त केल्या.
२३ मार्च २०२० पासून कोरोनाने सर्वत्र शिरकाव केला आहे. तेव्हापासून जारच्या पाण्याकडे नागरिकांचा ओढा तसा कमीच दिसून येत आहे. कोरोनाआधी जारच्या पाण्याला चांगली मागणी होती. आजमितीस शहरात २० तर जिल्ह्यात अंदाजे १२०० पाण्याचे प्लांट (जार) आहेत. २०१९ मध्ये जारमालकांना हिंगोली नगरपालिकेने पाणी शुद्धीकरण करूनच नागरिकांना द्यावे,अशी सूचनाही केली होती. कारवाई मात्र कोणावरही केली नाही, असेही सांगण्यात आले. कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याचे पाहून अनेक नागरिक घरचे साधे पाणी पिलेले बरे, असे म्हणत जारकडे कानाडोळा करीत आहेत. मार्च २०१९ मध्ये दररोज जारची विक्री ३ हजार होती, मार्च २०२० मध्ये दररोज १ हजार विक्री व्हायची, मार्च २०२१ मध्ये अंदाजे दररोज ६०० जारची विक्री होत होती. हा आकडा शहरातील असून जिल्ह्यातील आकडा समजू शकला नाही. सद्य:स्थितीत कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून अनेक नागरिक जार बंद करू लागले आहेत. त्यामुळे जार व्यवसायावर चांगलाच परिणाम झाला आहे. बेरोजगारीमुळे शहरातील सुशिक्षितांनी जारचा व्यावसाय सुरू केला. परंतु, कोरोनामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. खरे पाहिले तर जारचे पाणी आम्ही शुद्धीकरण करूनच देत असतो, असे जार व्यावसायिकांनी सांगितले.
जिल्ह्यात जवळपास १२०० प्लांट
जिल्ह्यात पाच तालुके असून नाही म्हटले तरी अंदाजे १२०० प्लांट तरी आजमितीस अस्तित्वात आहेत. यावर तालुका प्रशासन व नगरपालिकेचे नियंत्रण असते. कोरोनामुळे जिल्ह्यातील जार व्यवसायवर परिणाम झाला आहे. हिंगोली शहरात आजमितीस २० प्लांट सध्या कार्यरत आहेत.
पालिकेकडे २० प्रकल्पांची नोंद
हिंगोली शहरात जवळपास २० प्लांट असून त्याची नोंद नगरपालिकेकडे असल्याचे सांगण्यात आले. पाणी शुद्धीकरण करून देण्याच्या संदर्भात जार व्यावसायिकांना वेळोवेळी सूचना दिल्या जात असल्याचे नगरपालिकेने सांगितले. महिन्यातून एकवेळेस प्लांटची पाहणी केली जाते, असेही नगरपालिकेने सांगितले.
प्रतिक्रिया.............
कोरोना आधी चांगली विक्री व्हायची. परंतु, सध्या कोरोनाने ग्राहक कमी झाले आहेत. खरे पाहिले तर आम्ही पाणी शुद्धीकरण करून देत असतो. कोरोना आजाराचा नागरिकांनी धसका घेतला आहे. एकंदर व्यवसायावर परिणाम झाला आहे.
-मनीष जैन, जार विक्रेता
कोरोनाआधी जारचे पाणी चालू होते. परंतु, सध्या कोरोनाचे रुग्ण वाढू लागल्याचे पाहून जारचे पाणी घेणे बंद आहे. कोरोना संपल्यानंतर परत सुरू करणार आहोत.
-भाऊसाहेब पाईकराव, नागरिक
कोरोना आधीपासून आम्ही घरचे साधे पाणीच पित आहोत. जारचे पाणी शुद्ध असले तरी आम्हाला घरचे साधे पाणीच जास्त आवडते. कधी-कधी पाणी उकळूनही पित असतो.
-आनंद शर्मा, नागरिक