लोकमत न्यूज नेटवर्कसेनगाव : ग्रामसेवक गोपाल बेंगाळ यांचा पोलिस वाहनात झालेल्या मृत्यूप्रकरणी मयताचा नातेवाईकांनी पोलीस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केल्यानंतर तब्बल २६ तासानंतर शनिवारी रात्री अकरा वाजता मृतदेह ताब्यात घेतला.सेनगाव तालुक्यातील कोळसा येथे शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कारवाई केली होती. या कारवाईत ग्रामसेवक गोपाल बेंगाळ यांना ताब्यात घेतले होते. यावेळी बेंगाळ यांना पोलीस वाहनातून आणत असताना वाहनातच त्यांचा मृत्यू झाला होता. या प्रकाराने मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी पोलीस मारहाणीत ग्रामसेवक बेंगाळ यांचा मृत्यू झाला. असा आरोप करीत संबंधित पोलिस कर्मचाºयांवर खुनाचा गुन्हा दाखल करावा, या मागणी करिता शुक्रवारी रात्री ८ वाजेपासून सेनगाव पोलीस ठाण्यात ठिय्या मांडला होता. याप्रकरणी तब्बल २४ तास तोडगा निघाला नसल्याने संबंधित पोलिस अधिकारी मयताच्या नातेवाईकांचे समाधान करू शकले नाही. त्यामुळे मृतदेह २४ तास पडून होता.खुनाचा गुन्हा दाखल झाल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी भूमिका घेत सेनगाव पोलीस ठाण्यात ठाण मांडले होते. तर पोलीस यंत्रणा सीआयडी तपास झाल्यानंतर गुन्हा दाखल करू या भूमिकेवर ठाम होती. त्यातून मोठा तणाव निर्माण झाला होता. अखेर या प्रकरणात आ. तान्हाजी मुटकुळे यांनी मयताच्या नातेवाईकांची व संबंधित पोलिस अधिकाºयांची भेट घेऊन तोडगा काढला. त्यात कारवाईत सहभागी असलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या ५ पोलीस कर्मचाºयांना शनिवारी रात्री उशिरा निलंबित करण्याचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षकानी काढले. त्यानंतर मयत ग्रामसेवक बेंगाळ यांच्या नातेवाईकांनी तब्बल २६ तासानंतर मृतदेह ताब्यात घेतला. मध्यरात्री १ वाजता मयतावर कोळसा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.सदर प्रकरण हाताळण्यात सेनगाव पोलीसाना अपयश आले. तब्बल २४ तास पोलीस ठाण्यातून जमाव हटला नाही. अशा परिस्थितीत तणाव निर्माण झाला.पोलीस प्रशासनाने प्रकरण हाताळणी करताना गांभीर्य घेतले नसल्याने हा प्रकार घडला. ग्रामसेवक बेंगाळ यांच्या मृत्यू प्रकरणाची पुढील तपास सीआयडी करणार आहे. असे असले तरी तालुक्यात मोठ्या प्रमाणात फोफावलेले अवैध व्यवसाय, त्याला स्थानिक पोलीस यंत्रणे कडून मिळणारे पाठबळ, केलेले दुर्लक्ष अशा परिस्थितीत स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाच्या कारवाईत ग्रामसेवकाचा झालेला मृत्यु आणि त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती या सर्व प्रकरणांची वेगळी चौकशी करण्याची गरज आहे.या प्रकरणामुळे जिल्हाभरात खळबळ उडाली आहे.
तब्बल २६ तासानंतर मृतदेह घेतला ताब्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2018 12:15 AM