आखाडा बाळापूर ( हिंगोली ) : आपल्या सासरच्या मंडळीकडूनच दगा फटका झाला आणि त्यांनीच वडिलांचा खून केला अशी तक्रार मयताच्या मुलाने दिली होती. यावरून सासू-सासरा आणि मेव्हुण्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, या खून खटल्यातील तपासाला आता नाट्यमय कलाटणी मिळाली असून पित्याच्या खून प्रकरणी तक्रारदार मुलालाच बाळापुर पोलिसांनी अटक केली आहे.
हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील रामेश्वर तांडा तांडा ते एकघरी या परिसरात दिनांक 28 डिसेंबर 2022 रोजी आप्पाराव रामा राठोड , (वय 53 वर्ष ,राहणार कासारपेठ तांडा, तालुका भोकर जि.नांदेड ) यांचा मृतदेह आढळून आला होता. बाळापूरचे ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड व इतरांनी मयताची ओळख पटवून त्यांच्या कुटुंबीयांचा शोध घेतला. त्यावेळी सदर मयत व्यक्ती हे भोकर तालुक्यातील असल्याचे निष्पन्न झाले .तेथील व्यक्तीने रामेश्वर तांडा येथे येऊन कशी काय आत्महत्या केली याचा पोलीस शोध घेत होते. त्यावेळी त्यांचा मुलगा विठ्ठल आप्पाराव राठोड ( खाजगी नोकरी, हल्ली मुक्काम कॅप्टन चौक, उदगीर ) याने पैशाच्या वादातून आपल्या सासरच्या मंडळींनी वडिलांचा खून करून मृतदेह शिवारात फेकला असा आरोप करत तक्रार दिली.
सरकारी नोकरी लावतो म्हणून माझ्या वडिलांकडून 9 लाख रुपये घेतले होते. नोकरी लावली नाही आणि पैसेही परत दिले नाहीत. या वादातूनच वडिलांचा खून झाल्याचा आरोप मुलाने केला. त्यावरून स्वतःचे सासू , सासरा आणि मेव्हणा यांचे नावे सांगून त्यांना आरोपी केले. याप्रकरणी बाळापूर पोलिसांनी खूप तपास केला. अनेकांचे जबाब नोंदवले .या खुणाचे रहस्य उलगडणाचा प्रयत्न केला. दरम्यान, आता या प्रकरणाला नाट्यमय कलाटणी मिळाली असून या फिर्यादी मुलासच पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. वडिलांच्या खून प्रकरणी चक्क मुलगाच आरोपी निघाला. पोलिसांनी विठ्ठल आप्पाराव राठोड यास आरोपी म्हणून अटक केले आहे. न्यायालयाने त्याला 17 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावल्याची माहिती ठाणेदार पंढरीनाथ बोधनापोड यांनी दिली आहे.