हिंगोली : जिल्हा व्यापारी महासंघ व प्रवाशांच्या मागणीचा विचार करुन रेल्वे विभागाने पूर्णा ते अकोला ही ‘डेमो’ रेल्वे सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. ही डेमो रेल्वे १९ जुलै रोजी सकाळी ८.२० वाजेच्या दरम्यान हिंगाेली येथून अकोलाकडे रवाना होणार आहे.
कोरोनाआधी हिंगोली रेल्वे स्थानकातून तीन रेल्वे धावत होत्या. परंतु, कोरोना महामारीमुळे तिन्ही पॅसेंजर रेल्वे बंद केल्या आहेत. ‘डेमो’ रेल्वे सुरु करण्यासंदर्भात ८ जुलै रोजी रेल्वेचे महाव्यस्थापक गजानन माल्या यांची जिल्हा व्यापारी महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली होती. यावेळी ‘डेमो’ रेल्वे गाडीबरोबर इतर मागण्यांचे निवेदन जिल्हा व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी महाव्यवस्थापकांना दिले होते. व्यापाऱ्यांच्या मागणीचा विचार करुन डेमो रेल्वे सुरु करण्यात येईल, असे महाव्यवस्थापक माल्या यांनी आश्वासन दिले होते.
ही डेमो रेल्वे गाडी पूर्णा जंक्शन येथून सकाळी ७.३० मिनिटाला सुटणार असून हिंगोली रेल्वे स्थानकावर सकाळी ८.३० वाजेच्या दरम्यान येईल. व्यापारी व प्रवासी संघटनेच्या मागणीनुसार सध्या डेमो रेल्वे गाडी सुरु केली असल्याचे रेल्वे विभागाने सांगितले.
पूर्णा - अकोला मार्गावर प्रवासी संख्या अधिक आहे. तेव्हा पूर्वीप्रमाणे तीन पॅसेंजर रेल्वे सुरु करण्यात याव्यात, अशी मागणीही प्रवाशांनी केली आहे.
मास्कचा विसर पडू देऊ नका...
कोरोना महामारी ओसरत असली तरी, जिल्ह्यात रुग्ण रोजच आढळून येत आहेत. प्रवाशांच्या मागणीनुसार महाव्यवस्थापकांनी डेमो रेल्वे सुरु केली आहे. यादरम्यान, प्रवाशांनी मास्क घालणे अनिवार्य आहे. कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करावे लागणार आहे. जे प्रवासी कोरोना नियमांचे पालन करणार नाहीत, त्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे दंडही भरावा लागेल. पूर्वी तीन पॅसेंजर रेल्वे होत्या. सध्या तरी रेल्वे विभागाने एकच पॅसेंजर रेल्वे सुरु केली आहे.
- रामसिंग मीना, रेल्वे स्टेशन मास्तर, हिंगोली