लोकमत न्यूज नेटवर्कवसमत : शहरात शनिवारी ७.३० वाजण्याच्या सुमारास सत्यनारायण टॉकीजजवळ अचानक गोंधळ झाला. दगडफेक, हाणामारी, तलवारी घेवून तरूणांची धावाधाव यामुळे दहशतीचे वातावरण निर्माण झाले. यात बाजारपेठेतील दुकाने धडाधड बंद झाली. पोलिसांनी तातडीने धाव घेतल्याने जमाव पांगला.वसमत शहरात शनिवारी रात्री सत्यनारायण टॉकीजजवळ तरूणांचा गट वाढदिवस साजरा करत होता. यावेळी टीजे वाजवून जल्लोष होत होता. तेव्हा अचानक अचानक वाद सुरू झाला. दोन गट समोरासमोर आले. प्रचंड दगडफेक झाली. यानंतर धावाधाव, आरडाओरडा सुरू झाला. काठ्या, तलवारीसह काही जण रस्त्याने धावत सुटल्याने दहशतीचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे व्यापाऱ्यांनी दुकाने बंद करण्यास सुरूवात केली. १० मिनीटांतच बाजारपेठ बंद झाली. शहरात अफवा, चर्चा सुरू झाल्या. दोन समाजात हाणामारी सुरू झाल्याच्या चर्चेने तणावात भर पडली. पोलिसांची वाहने सायरन वाजवत घटनास्थळी दाखल झाल्यानंतर जमाव पांगला.एका पानटपरीवर एका गटाने दगडफेक केली. ज्या भागात हा प्रकार घडला त्याच ठिकाणी खांबावर पोलिसांचे सीसीटीव्ही लावलेले आहेत. त्यात हा सर्व प्रकार कैद झाला असावा. मकरसंक्रांतीनिमित्त हळदी -कुंकवाच्या कार्यक्रमासाठी घराबाहेर पडलेल्या महिला या प्रकाराने भयभीत झाल्या. पोलिसांनी तातडीने हालचाली केल्याने प्रकरण हाताबाहेर गेले नाही. मात्र शेवटपर्यंत हा प्रकार काय झाला, कोणी कोणावर हल्ला केला, घटनेमागचे कारण काय? हे मात्र समजण्यास मार्ग नव्हता. काय झाले? हाच प्रश्न जो तो एक दुसºयाला विचारत होता.यासंदर्भात पोनि आर.आर.धुन्ने यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी वाढदिवस साजरा करणारे व त्या भागातील काही तरूण यांच्यात वाद झाल्याने गोंधळ झाला. पळापळी झाल्याने अफवा वाढल्या व व्यापाºयांनी दुकाने बंद केल्याचे सांगितले. शहरात कोणताच अनुचित प्रकार झाला नाही, नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.वसमत शहरात दहशतीचे, गुंडागर्दीचे प्रकार नेहमीचेच झाले आहेत. यापूर्वीही अनेकदा तलवारबाजीसारखे प्रकार घडले. यात सामान्य नाहक वेठीस सापडतात. त्यामुळे पोलिसांनी एकदा दंगेखोरांना धडा शिकविणे गरजेचे बनले आहे.
दगडफेकीनंतर बाजारपेठ बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 12:15 AM