हिंगोली:येथील हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे ७ गुन्हे दाखल असलेल्या व समाजासाठी धोकादायक बनलेल्या एकास परभणी मध्यवर्ती कारागृहाचा रस्ता दाखविला आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी 'एमपीडीए' अंतर्गंत त्यास एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्धतेचे आदेश निर्ममित केले आहेत.
करण अशोक मुदीराज (वय २३ रा.गाडीपुरा, हिंगोली) असे 'एमपीडीए'अंतर्गंत कार्यवाही केलेल्याचे नाव आहे. त्याचेविरूद्ध हिंगोली शहर पोलिस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे ७ गुन्हे दाखल आहेत. प्रतिबंधात्मक कार्यवाही करूनही तो सतत गुन्हे करीत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भिती व असुरक्षितेची भावना निर्माण झाली होती. त्यामुळे त्याचेविरूद्ध 'एमपीडीए' अंतर्गंत कार्यवाही करावी, असा प्रस्ताव पोलिस निरीक्षक विकास पाटील यांनी अप्पर पोलिस अधीक्षक अर्चना पाटील यांच्यामार्फत पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्याकडे सादर केला होता. प्रस्तावाची तपासणी करून हा प्रस्ताव जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे सादर केला होता. जिल्हाधिकारी पापळकर यांनी प्रस्तावाची पडताळणी करून करण अशोक मुदीराज याचेविरूद्ध 'एमपीडीए'अंतर्गंत एक वर्षासाठी कारागृहात स्थानबद्धतेचे आदेश निर्ममित केले आहेत. पोलिसांनी त्यास ताब्यात घेतले असून परभणी मध्यवर्ती कारागृहात रवानगी करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
वर्षभरात २९ जणांना पाठविले कारागृहातपोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांनी जवळपास वर्षभरापूर्वी पदभार स्विकारला. त्यानंतर त्यांनी अवैध धंदे, सतत गुन्हे करणाऱ्यांविरूद्ध कार्यवाहीची कडक भूमिका घेतली. या संदर्भात कोंबिंग ऑपरेशनही राबविण्यास सुरूवात केली. वर्षभरात २९ जणांवर 'एमपीडीए' अंतर्गंत कार्यवाही करून त्यांची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे.