हिंगोली : शेतकरी अनेक अडचणीचा सामना करत शेतीतून उत्पन्न काढण्याचा प्रयत्न करतो. मात्र, बरेचदा तो या अडचणीमुळे खचून जातो. त्यांना यातून बाहेर काढण्याची जबाबदारी कृषी उत्पन्न बाजार समितीची आहे. यामुळे त्यांनी कायम शेतक-यांना केंद्रबिंदू मानून कार्य करावे व त्यांच्या अडचणी सोडविण्याकडे लक्ष द्यावे असे मत सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी व्यक्त केले. ते ‘सहकारी चळवळीची वाटचाल, संधी व आव्हाने’ या विषयावरील चर्चासत्रात बोलत होते.
या चर्चासत्राच्या अध्यक्षस्थांनी आ. तान्हाजी मुटकुळे तर प्रमुख पाहुणे म्हणून जि. प. अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, महिला अध्यक्षा उज्वला तांभाळे, आ. माजी खा. अॅड. शिवाजी माने, माजी. आ. कुंडलिक नागरे, आ. गजानन घुगे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, अॅड. शिवाजीराव जाधव, यशोदा कोरडे आदींची उपस्थिती होती. यावेळी बोलताना मंत्री देशमुख यांनी शेतकरी व महिलांनी कार्यकारी संस्थात कार्य करण्याचे आवाहन केले. यातून प्रत्येकाला रोजगार उपलब्ध होऊ शकतो असे सांगितले. ग्रामिण भागातील संस्थाचा प्रस्ताव राज्यसरकार विचारत घेईल. या संस्थेचे स्वत:चे भागभांडवल आणि राज्य सरकारच्या मदतीतून कर्ज उपलब्ध करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. तसेच जास्तीत जास्त शेतक-यांनी शेतमाल तारण कर्ज योजनेचा लाभ घेऊन आपली अडचण दुर करावी. जिल्ह्यामध्ये गोडाऊनची कमी असेल तर सरकारी, खाजगी गोदाम भाडेत्वावर घेऊन ही योजना उत्कृष्टपणे राबविण्यासाठी कृषी समितीने पुढाकार घेण्याचे सांगितले.
उसाच्या प्रश्नात लक्ष देणार सध्या उसाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यावरही लक्ष केंद्रीत करणार असल्याचे देशमुख यांनी सांगितले. हिंगोली जिल्हामध्यवर्त्ती बँकेचा ठराव माझ्यापर्यंत आल्यानंतर तो देखील मार्गी लावणार असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. या सोबतच आ. मुटकुळे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीसाठी २५ एकर जमिनीची मागणी केली. मान्यवरांनी जिल्ह्यातील कृषीच्या समस्या मांडल्या. सूत्रसंचालन के. के. शिंदे यांनी तर प्रस्ताविक जिल्हाउपनिबंधक सुधिर मैत्रेवार, आभार डॉ. सय्यद जब्बार पटेल यांनी मानले.