गोरेगाव (जि. हिंगोली): येथील नीलडोह शिवारात सेनगाव रस्त्यावर एका कृषी सहायकाच्या चालत्या कारला आग लागली. या आगीत कारमधील साहित्य व कार्यालयीन कागदपत्रे जळून कारही भस्मसात झाली. ही घटना २५ फेब्रुवारीच्या रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास घडली.
कृषी सहायक गोडाती बबनराव काळे (रा. हाताळा, ता. सेनगाव) हे प्रसंगावधान राखत कार वाहन जागीच उभे करून तत्काळ बाहेर पडले. त्यामुळे जीवितहानीचा अनर्थ टळला. मात्र यामध्ये काळे यांचा डावा हात थोडासा जळाला आहे. तर आतमधील मोबाईल, पॅनकार्ड, आधार, एटीएमकार्ड, चेकबूक, पासबुक, ड्रायव्हिंग लायसन्स, कपडे, रोख २० हजार रुपये तसेच कार्यालयीन कागदपत्रे जळाली. सोबत (एम. एच. ३८- ७६४८) क्रमांकाची कार आगीत पूर्णत: भस्मसात झाली. सदर प्रकरणी गोरेगाव पोलिस ठाण्यात अकस्मात जळीत नोंद करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली. तपास सपोनी रवी हुंडेकर यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार अनिल भारती करीत आहेत.
नंबरप्लेट सेफ राहिल्याने संभ्रम ...
सदरील कार वाहन हे आतमधील साहित्यासह संपूर्णपणे भस्मसात झाले असताना कारच्या मागील बाजूच्या पांढऱ्या रंगाच्या नंबर प्लेटला आगीचा जरा देखील शेक लागला नाही. त्यामुळे कार वाहन पूर्णत: जळून खाक झाले असताना नंबरप्लेट सुरक्षित राहिली कशी ? असा प्रश्न उपस्थित होतो आहे. घटनास्थळावरून परतलेल्या नागरिकांमधून घटनेविषयी तर्कवितर्क लावीत सदरील कार जळीत प्रकरणाबाबत संभ्रम व्यक्त केला जात आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"