हिंगोली : शहरातील जलेश्वर मंदिरात २५ सप्टेंबर रोजी सायंकाळी सात वाजता घेण्यात आलेल्या आकाशवाणी कार्यक्रमाने ऐतिहासिक दसरा महोत्सवाला प्रारंभ झाला. या दसरा महोत्सवाचे यंदा १६८ वे वर्ष आहे, तर २६ सप्टेंबरपासून घटस्थापनेने नवरात्रोत्सवाला सुरुवात होणार असून, सर्वत्र जय्यत तयारी करण्यात आली आहे.
सार्वजनिक दसरा महोत्सव समितीच्या वतीने येथील रामलीला मैदानावर दसरानिमित्त कृषी प्रदर्शनी, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांसह विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी येथील जलेश्वर मंदिरात आकाशवाणीचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाने दसरा महोत्सवाला प्रारंभ झाला आहे.
यावेळी दसरा महोत्सव समितीचे अध्यक्ष तथा उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, सचिव तथा तहसीलदार नवनाथ वगवाड, नायब तहसीलदार मधुकर खंडागळे, ॲड. किरण नर्सीकर, राजेंद्र हलवाई, विश्वास नायक, गणेश साहू, पिंटू टाले, बगडीया, आदींची उपस्थिती होती. दरम्यान, २६ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४वाजता रामलीला मैदानावर कृषी प्रदर्शनीचे उद्घाटन होणार आहे. त्याचबरोबर श्री.हनुमान मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे.