हिंगोली : शहर तसेच ग्रामीण भागामध्ये बहुतांश डॉक्टर पॅथीचा स्पष्ट उल्लेख न करता दवाखान्यासमोर लावलेल्या पाटीवरील नावासमोर ‘एमडी’ आणि ‘एमएस’ असा उल्लेख करत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होत आहे. शासनाने याबाबत दखल घ्यावी म्हणून ‘आयएमए’ ने ८ सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
जिल्ह्यातील काही डॉक्टर मंडळी ‘एमडी’ आणि ‘एमएस’ अशा पदव्या लावून तसेच नावासमोर स्त्रीरोगतज्ज्ञ, फिजिशियन, हृदयरोगतज्ज्ञ अशा पाट्या बिनधास्तपणे लावत आहेत. हा प्रकार म्हणजे नागरिकांच्या जिवाशी खेळण्याचा आहे. वास्तविक पाहता एखादा डॉक्टर प्रॅक्टिस करीत असताना तो ॲलोपॅथी, होमिओपॅथी, अल्टर्नेटीव्ह, युनानी काही असू शकतो. तेव्हा त्यांनी पॅथीचा स्पष्ट उल्लेख करणे आवश्यक आहे. परंतु, सध्यातरी तसे होताना दिसून येत नाही. जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनावर आयएमएचे अध्यक्ष डॉ. सचिन बगडिया, सचिव डॉ. यशवंत पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
पारदर्शकतेसाठी डिग्रीचा उल्लेख असावा...
डॉक्टर कोणत्या पॅथीचा आहे आणि त्याने कोणती पदवी प्राप्त केली, हे सर्वसामान्यांना कळण्यासाठी पाटीवर डिग्रीचा उल्लेख असणे अत्यंत आवश्यक असून, कायद्यानुसार बंधनकारक पण आहे. डिग्रीचा उल्लेख नाही केल्यास नागरिकांमध्ये संभ्रमावस्था निर्माण होत आहे. डिग्रीचा उल्लेख पाटीवर केल्यास खऱ्या अर्थाने पारदर्शकता येणार आहे. एवढेच कार्य डॉक्टरांवर नागरिकांचा विश्वास बसेल. गत काही वर्षांपासून काही डॉक्टर ‘एमडी’ ‘एमएस’ डिग्रीचा उल्लेख न करता दवाखान्यासमोर ‘तज्ज्ञ’ म्हणून पाट्या लावत आहेत, हे चुकीचेच आहे.
- डॉ. किशन लखमावार, नेत्ररोगतज्ज्ञ