हिंगोली तालुक्यातील लोहरा येथे केशव दत्ता धाडवे व सेनगाव तालुक्यातील केलसुला येथे कलीम बागवान व विलास इप्पर यांनी खासगी दवाखाने थाटून रुग्णांवर उपचार सुरू केले होते. मात्र, या तिन्ही डॉक्टरांच्या पदव्या बोगस असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यावरून आरोग्य विभागाच्या पथकाने काही दिवसांपूर्वी दवाखान्याची झाडाझडती घेत डॉक्टरांच्या पदव्यांची तपासणी केली होती, तसेच वैद्यकीय व्यावसायिकाची कागदपत्रे तपासणीसाठी जिल्हास्तरीय पुनर्विलोकन समितीकडे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. यावेळी समितीने तिन्ही डॉक्टरांच्या पदव्यांची तपासणी केली असता पदव्या बोगस असल्याचे स्पष्ट झाले. याबाबत जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी याबाबत बैठकीत माहिती घेत बोगस डॉक्टरांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यानुसार जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी संबंधित तालुका आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र पाठविले आहे. या कारवाईमुळे बोगस वैद्यकीय व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
जिल्ह्यात अजूनही अनेक ठिकाणी अवैधरीत्या खासगी व्यवसाय करणाऱ्या बोगस डॉक्टरांबाबत तक्रारीच नसल्याने त्यांचा हा व्यवसाय राजरोसपणे सुरू आहे. मात्र, ज्यांची तक्रार झाली, त्यांच्यावरच कारवाई होत असून इतरांना मात्र रान मोकळे असल्याचे चित्र दिसून येत आहे.