जिल्ह्यात जवळपास १६ कोविड हेल्थ सेंटर आहेत. त्यात शहरात जवळपास १० कोविड सेंटर आहेत. दोन महिन्यांपासून कोरोनाचे रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. शहर छोटे असले तरी चकरा मात्र मोठ्या प्रमाणात माराव्या लागत आहेत. रुग्णांना बेडस् उपलब्ध झाला नाही तर लगेच नातेवाईक गाडी काढायला लावतात आणि दुसऱ्या दवाखान्यात घेऊन जातात. सोबत रुग्णांचे नातेवाईकही असतात. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना काही रुग्णवाहिकेच्या चालकांना पीपीई कीट, मास्कही जिल्हा रुग्णालयाच्या वतीने देण्यात आलेले नाहीत, अशी तक्रारही केली आहे. खरे पाहिले रुग्णवाहिकेच्या चालकांना कमीत कमी मास्क तरी द्यावा पण तोही मिळत नाही, अशी खंतही काहींनी व्यक्त केली. बहुतांश रुग्णांचे नातेवाईक मास्क लावत नाहीत. दररोज शहरात ४० ते ४५ रुग्णांना घेऊन ॲब्युलन्सची भटकंती सुरू असते.
प्रतिक्रिया
‘गाडी बरोबर नळ्याची यात्रा’ म्हणतात ना? तशी अवस्था आमची झाली आहे. कोरोना रुग्णांना घेऊन रोज दहा ते बारा चकरा माराव्या लागत आहेत. शहरात जवळपास नऊ कोविड हेल्थ सेंटर आहेत. जिथे जागा शिल्लक आहे तिथे कोरोना रुग्णांना घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे उन्हातान्हात चांगलीच परेशानी होत आहे.
- रघुनाथ इंगळे, चालक
कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढत आहेत. रुग्णांचे नातेवाईकांनी सांगितले तिथे कोरोना रुग्णांना घेऊन जावे लागत आहे. रुग्णाला जागा मिळेपर्यंत दवाखान्यात कधी-कधी बसावे लागते. रुग्णांसमवेत त्याचे नातेवाईकही असतात. जवळपास दिवसातून पाच-सहा तरी फेऱ्या शहरातील दवाखान्यात कराव्या लागत आहेत.
- गजानन वाहुळे, चालक