लोकमत न्यूज नेटवर्कहिंगोली : मानव विकासकडून गरोदर व बाळंत मातांना दिल्या जाणाऱ्या बुडित मजुरीचा अद्याप लाभ महिलांना मिळाला नाही. आरोग्य विभागातर्फे निधी लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करण्याचे नियोजन केले जात असल्याचे सांगितले जात आहे. प्रत्यक्षात मात्र तालुका स्तरावरून याद्याच अप्राप्त आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम कधी वर्ग होईल? हा प्रश्नच आहे.मानव विकासकडून गरोदर व बाळंत मातांना बुडित मजुरी दिली जाते. प्रत्येकी चार हजार रूपये याप्रमाणे लाभार्थी मातेच्या खात्यावर रक्कम वर्ग करण्यात येते. जिल्ह्यातील ३ हजार ८९ महिलांना बुडित मजुरीचा लाभ दिला जाणार असल्याची माहिती आरोग्य खात्याकडून देण्यात आली. मात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर पैसे जमा करण्याची प्रक्रिया अतिशय संथगतिने सुरू असल्याचे चित्र आहे. त्यामुळे लाभार्थी मातांना शासनाकडून निधी प्राप्त होऊनही योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. अनुसूचित जाती, अनु. जमाती आणि दारिद्र्य रेषेखालील गरोदर व बाळंत महिलांना या योजनेचा लाभ देण्यात येतो. गरोदरपणात आणि प्रसूतीनंतरच्या कालावधीत मानव विकासकडून मातांची मजुरी बुडते.सदर महिला आर्थिक लाभासाठी मजुरी करण्यासाठी किंवा कामावर जाऊ नये याची काळजी घेत मानव विकास योजनेअंतर्गत बुडित मजुरी दिली जाते. प्रथम दोन हजार आणि प्रसूतीनंतर दोन हजार रुपये एकूण चार हजार रूपये अशी लाभाची रक्कम आहे. सदर लाभाची रक्कम ही लाभार्थी महिलेच्या बँक खात्यावर वर्ग केली जाते.मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत आरोग्य विभागाकडे गरोदर मातांना बुडित मजुरी म्हणून अर्थसहाय्यसाठी १ कोटी २३ लाख ५६ हजार रूपये निधीस मंजुरी मिळाली आहे. गर्भवती महिलांची व ० ते ६ वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी तसेच औषधोपचार व शिबीरे यासाठी ४६ लाख ८ हजार रूपये निधीस मंजुरी मिळाली. मानव विकासकडून निधी जिल्हा परिषदेच्या आरोग्य खात्याकडे वर्ग करण्यात आल्याचे सांगण्यात आले.तालुकास्तरावरून लाभार्थ्यांच्या याद्याही अप्राप्त आहेत. जिल्ह्यातील औंढा नागनाथ, सेनगाव व हिंगोली या तीन तालुक्यांचा मानव विकासमध्ये समावेश आहे. या तीन्ही तालुक्यातील अपेक्षित लाभार्थी महिलांची तालुकानिहाय आकडेवारी यामध्ये हिंगोली तालुक्यातील १०७२ लाभार्थी महिलांचा समावेश आहे. सेनगाव तालुक्यातील १०९३ आहे. तर औंढा नागनाथ तालुक्यातील ९२४ याप्रमाणे एकूण ३०८९ महिलांना बुडित मजुरी देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर रक्कम वर्ग करण्याचे नियोजन केले आहे.जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातील संबधित विभागाचे दुर्लक्ष आहे. शिवाय निधी वर्ग करण्याबाबत विचारले असता, सविस्तर माहिती दिली जात नाही. तर कर्मचारी माहिती देण्यासही टाळाटाळ करीत आहेत.
महिलांना मिळेना लाभाची रक्कम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 05, 2019 11:52 PM