- गजानन वाखरकरऔंढा नागनाथ (हिंगोली): येथील जैन मंदिर परिसरात खोदकाम करताना एक प्राचीन मूर्ती सापडल्याची घटना मंगळवारी ( दि. ३१ ) घडली. ही मूर्ती कुंथूनाथ भगवंताची असल्याची माहिती पुढे आली आहे.
सोनुने गल्लीत एक (वॉर्ड क्र. १६) जैन मंदिर आहे. येथे नवीन मंदिर उभारण्याचे नियोजन आहे. यामुळे जुन्या मंदिराच्या समोरील परिसरात खोदकाम सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी ( दि. ३१ ) सकाळी साडेआठ वाजच्या सुमारास खोदकाम सुरु असताना पाच फुट खोल मातीत एक मूर्ती आढळून आली. मूर्ती पाच फूट उंचीची आहे. साफसफाई केल्यानंतर मूर्तीबद्दल जैन मुनींकडून अधिक माहिती घेण्यात आली. तेव्हा ही मूर्ती कुंथूनाथ भगवंताची असल्याची माहिती मिळाल्याचे जैन मंदिराचे अध्यक्ष तेजकुमार झांजरी यांनी सांगितले. तसेच ही मूर्ती १६०० वर्ष जुनी असण्याची शक्यता असून पुरातत्व विभागाकडून अधिक माहिती घेण्यात येत आहे.
दरम्यान, प्राचीन मूर्ती सापडल्यामुळे जैन समाजात आनंद व्यक्त होत आहे. आज सकाळी मूर्तीची विधिवत पूजा करण्यात आली. मूर्ती मुख्य मंदिरात तात्पुरत्या स्वरुपात ठेवण्यात आली. यावेळी राजकुमार झांजरी, अनिल झांजरी, अनंत झांजरी व सकल जैन समाज उपस्थित होता.