औंढा नागनाथ (हिंगोली) : येथील कनकेश्वरी देवी मंदिराच्या परिसरातील विकास कामांसाठीच्या खोदकामादरम्यान आज दुपारी पुरातन अवशेष आढळून आले आहेत. यात दगडी शिल्प, नक्षीकाम असलेले खांब, एक मूर्ती सापडल्याने सध्या हे काम थांबविण्यात आले आहे.
औंढा नागनाथ हे बारा ज्योतिर्लिंगापैकी आठवे ज्योतिर्लिंगाचे ठिकाण आहे त्यामुळे येथे मंदिराच्या चहुबाजूने अनेक मंदिरे आहेत. येथे तलावाच्या पैलतीरावर तुळजापूर शक्तिपीठ म्हणून कनकेश्वरी देवीचे सुंदर मंदिर आहे. मंदिर परिसरात सध्या आमदार संतोष बांगर यांच्या विकास निधीतून अनेक कामे सुरु आहेत. मुख्य रस्त्यापासून मंदिरापर्यंत आता नव्याने मजबूत सिमेंट रस्ता तयार करण्यात आला आहे. तर परिसराचे सपाटीकरण करून येथे उद्यान उभारण्याची योजना आहे.
यासाठी जेसीबीद्वारे खोदकाम सुरू करण्यात आले. वरील माती बाजूला सारताच खाली नक्षी काम असलेले दगड, मंदिर कुंडाचे पुरातन अवशेष आढळून आले. अवशेषावरून येथे पूर्वी महादेवाचे किंवा गणपतीचे मंदिर असण्याची शक्यता आहे. या अवशेषांची पुरातत्व विभागाने पाहणी करण्याची मागणी महंत डॉ. पद्मनाम गिरी महाराज, नगरसेवक अनिल देव यांनी केली आहे. खोदकामात मंदिर अवशेष आढळून आल्याची माहिती पंचक्रोशीत पसरल्याने भाविकांची गर्दी होत आहे. हे अवशेष कशाचे आहेत ? कोणत्या कालखंडातील आहेत ? याची उत्सुकता वाढली आहे.