लोकमत न्यूज नेटवर्ककौठा : चोर, लुटारु व गुन्हेगारी वृत्तीपासून समाजाचे रक्षण करणारे पोलीस एवढीच ओळख न ठेवता या समाजात गरजवंताला व कुटुंबापासून दुरावलेल्यांनाही आधार पोलीस देत असल्याची प्रचिती वसमत ग्रामीण पोलिसांच्या कृतीने समोर आली आहे. गणेश उत्सवाच्या धामधुमीत वसमत तालुक्यातील आसेगाव येथे रात्रीच्या वेळी एक युवती संशयास्पदरीत्या फिरताना आढळून आली. ग्रामस्थांनी याबाबत वसमत ग्रामीण पोलिसांना माहिती दिली. त्यावेळी पोलिसांचे पथक तात्काळ आसेगाव येथे पोहोचले. पथकातील मिरासे, मुंढे यांच्यासह महिला पोलीस वाघमारे यांनी सदरील युवतीस ताब्यात घेऊन ठाण्यात आणले. तेव्हा ही युवती मनोरुग्ण असल्याचे समोर आले. मग सपोनि बी.आर. बंदखडके व त्यांंच्या सहकाऱ्यांनी पोलिसी बाणा थोडासा बाजूला करुन आस्थेवाईकपणे चौकशी केली असता ती जालना जिल्ह्यातील खरपुडी येथील असल्याचे व तिचे नाव ललिता जाधव (२५) असल्याचे समजले. बंदोबस्ताचा ताण असूनही पोलिसांनी लगेच खरपुडीत संपर्क साधून युवतीच्या कुटुंबियांना माहिती दिली. त्यानंतर युवतीची आई पार्वतीबाई जाधव वसमतला आल्यानंतर सर्व सोपस्कार पूर्ण करुन तिला कुटुंबाच्या स्वाधीन करण्यात आले. मागील अनेक दिवसांपासून घरापासून दूर राहिलेली ललिता जाधव ही पुन्हा आईकडे जाताच तिच्या चेहºयावर हास्य फुलले. तर तिच्या आईचेही हृदय भरुन आले होते. पोलिसांच्या माणुसकीचे दर्शन आम्हाला झाल्याचे ललिताच्या कुटुंबियांनी सांगितले.
...अन् तिला केले कुटुंबियांच्या स्वाधीन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 12:40 AM